मुलांसाठी ‘ते’ पुन्हा आले एकत्र

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 14 नोव्हेंबर 2019

आई-वडिलांमधील वादाचा मुलांवर परिणाम होतो. त्यांना दोघांच्याही सहवासाची गरज असते. त्यामुळे मुलांना केंद्रस्थानी ठेवून पालकांनी योग्य ते निर्णय घ्यावे. 
- स्मिता जोशी, विवाह समुपदेशक, कौटुंबिक न्यायालय

पुणे - वैचारिक मतभेदातून त्यांचे बिनसले... चार वर्षे घटस्फोटाचा दावा कौटुंबिक न्यायालयात सुरूच होता... मात्र, दोघांचे मुलांवरील प्रेम कणभरही कमी झाले नाही अन्‌ प्रेमाचा हाच दुवा त्यांना पुन्हा एकत्र आणण्यात महत्त्वाचा ठरला. मुलांसाठी ते पुन्हा एकत्र आल्याचे आदर्श उदाहरण कौटुंबिक न्यायालयात नुकतेच पाहायला मिळाले.

मुलांसाठी तुम्ही एकत्र येणे गरजेचे असल्याचे समुपदेशन या दांपत्याचे वारंवार करण्यात आले. त्यामुळे प्रवीण आणि लता हे जोडपे आता सर्व वाद विसरून पुन्हा एकत्र आले आहेत. लता या महाविद्यालयात शिक्षिका आहेत, तर प्रवीण हे व्यावसायिक. पत्नीवरील चारित्र्याच्या संशयावरून त्यांच्यात वाद होता. त्यामुळे प्रवीण यांनी घटस्फोटासाठी दावा दाखल केला, तर लता यांनी पोटगी मिळण्याची मागणी केली होती. त्यांना १३ वर्षांचा मुलगा (अमेय), तर आठ वर्षांची मुलगी (पूजा) (सर्व नावे बदललेली) आहे. हे दोघेही आईसोबत राहत.

दिवाळीच्या सुटीत मुलांचा ताबा मिळावा म्हणून त्यांच्या वडिलांनी अर्ज केला होता. मात्र, आई त्यासाठी तयार नव्हती. त्यामुळे समुपदेशकांनी त्यांना सल्ला दिला की, तुम्हीदेखील मुलांसोबत पतीच्या घरी जा. पुन्हा एकत्र येऊन त्यांच्यात मुलांसह संवाद झाल्याने व दोघांना एकाच वेळी मुलांचा सहवास लाभल्याने त्यांचे वाद  िटले व ते पुन्हा एकत्र आले, असे कौटुंबिक न्यायालयातील समुपदेशक स्मिता जोशी यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: child compromise family court love humanity motivation lifestyle