...तरच मुले होतील मोबाईलपासून दूर!

Mobile
Mobile

पुणे - 'आर्टिफिश इंटेलिजन्स’पेक्षा ‘नॅचरल इंटेलिजन्स’ अधिक जवळचा असतो, हे पालकांनी कृतीतून मुलांना पटवून द्यावे. त्यातून मुलंच स्वतःहून मोबाईलचा वापर कमी करतील, असा विश्‍वास वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.  

जन्मल्यापासून मुलाच्या डोळ्यांसमोर दिसतो तो फक्त आणि फक्त मोबाईल. काही वर्षांपूर्वी केवळ संवादासाठी वापरला जाणारा मोबाईल ‘स्मार्ट फोन’वर आता ‘व्हिडिओ कॉल’ सुरू झाले. थोडं मोठं झाल्यावर तेच मूल फोनवर गेम खेळते. इतक्‍यात, लहानपणापासून सतत डोळ्यांसमोर दिसणाऱ्या मोबाईलला या क्षणापासून हात लावायचा नाही, असा फतवा अचानक घरामधून निघतो... काय झालं... काय चुकलं काहीच कळायला तयार नसलेला पौगंडावस्थेतील मुलापुढं काय करायचं, हा प्रश्‍न पडतो, अशी अवस्था सध्या बहुतांश घरांमध्ये दिसते. त्यातून मार्ग काढण्यासाठी पालकांनी स्वतःपासून सुरवात केली पाहिजे, असा सल्लाही तज्ज्ञांनी दिला आहे. 

याबाबत बालरोगतज्ज्ञ डॉ. शरद आगरखेडकर म्हणाले, ‘‘लहान मुलांना मोबाईलची सवय लावूच नये, हे सर्वप्रथम लक्षात घेतले पाहिजे. मोबाईल मुलाच्या हातात दिल्यानंतर तो शांत बसतो, असे म्हणत पालक बिनधास्त मोबाईल मुलाकडे देतात; पण त्याचे प्रमाण वाढत जात असल्याचे लक्षात येताच ते अस्वस्थ होतात. त्यातही ते मूल पौगंडावस्थेत असल्यास मोबाईलवर नक्की काय बघायचं, याची माहिती नसते. त्यामुळे इतर आकर्षणं निर्माण होतात. त्यातील गेमच्या ‘लेव्हल’पूर्ण करण्याची धडपड वाढते. या दोन्ही गोष्टी मुलांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी वाईट असतात. त्यातून मुलांची नवनिर्मिती क्षमता कमी होते. मुलं ‘आर्टीफिशल इंटेलिजन्स’च्या आहारी जातात. त्यांना यातून बाहेर काढण्यासाठी नैसर्गिक ‘इंटेलिजन्स’चे महत्त्व पालकांनी पटवून दिले पाहिजे.’’

डॉ. प्रसाद सागर म्हणाले, ‘‘शाळेतून आल्यावर मुलांना मैदानावर खेळायला पाठविले पाहिजे. त्यातून मोबाईलबद्दलचे आकर्षण कमी होईल.’’

मोबाईल वापरू नये, याबद्दल घरातील सर्व मोठ्या माणसांचे एकमत असले पाहिजे. अनेकदा मुलाच्या मोबाईल वापराबद्दल आजी-आजोबांना कौतुक वाटते; पण ते आईवडिलांना आवडत नाही. त्यातून मुलाचे मोबाईलबद्दलचे आकर्षण वाढते. त्यासाठी सर्वांचे एकमत असले पाहिजे.
-  डॉ. शरद आगरखेडकर, बालरोगतज्ज्ञ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com