रस्त्यावरच्या मुलाला मिळाली बालगृहाची ऊब!

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 22 डिसेंबर 2018

पुणे - सध्याच्या कडाक्‍याच्या थंडीत आपण घराच्या सगळ्या खिडक्‍या-दारे बंद करून अंगावर पांघरूण घेऊन झोपतो... पण आपल्याच शहरात अवघ्या दहा वर्षांचा मुलगा हाडे गोठविणाऱ्या थंडीत कुडकुडत रिक्षात झोपतो... हे फक्त एक-दोन दिवस नाही, तर रोजच्या रोज... कोणत्याही संवेदनशील माणसाच्या अंगावर अक्षरशः काटा उभा राहावा, अशी ही घटना सांस्कृतिक राजधानीच्या शहरात घडते.

पुणे - सध्याच्या कडाक्‍याच्या थंडीत आपण घराच्या सगळ्या खिडक्‍या-दारे बंद करून अंगावर पांघरूण घेऊन झोपतो... पण आपल्याच शहरात अवघ्या दहा वर्षांचा मुलगा हाडे गोठविणाऱ्या थंडीत कुडकुडत रिक्षात झोपतो... हे फक्त एक-दोन दिवस नाही, तर रोजच्या रोज... कोणत्याही संवेदनशील माणसाच्या अंगावर अक्षरशः काटा उभा राहावा, अशी ही घटना सांस्कृतिक राजधानीच्या शहरात घडते.

गोखलेनगर येथील टिळक मित्र मंडळाजवळील शकुंतला उद्यानाजवळ तो बसायचा. कोणी देईल ते, मिळेल ते, मिळेल तसं अन्न तो खायचा. सूर्यास्त झाल्यानंतर याच परिसरात रस्त्याच्या कडेला उभ्या केल्या जाणाऱ्या रिक्षातच तो झोपायचा. हे एक-दोन दिवस नाही, तर अनेक दिवस सुरू होते; पण एके दिवशी उद्यानाजवळ बसलेल्या त्या मुलावर प्रदीप कांबळे यांचे लक्ष गेले. त्या मुलाचा निस्तेज झालेला चेहरा... कोमेजलेलं बालपण हे येथे व्यवसाय करणाऱ्या कांबळे यांनी क्षणार्धात टिपलं. कांबळे यांनी सुरवातीला त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला; पण औपचारिकतेच्या पुढे बोलणे होत नव्हते. नाव, गावापर्यंतच संवाद होत होता. पोटात भुकेचा आगडोंब उसळल्याने चिमुकल्याकडून उत्तरांची अपेक्षा काय करावी, हे कांबळे यांच्या लक्षात आले. त्यांनी त्याला खायला दिले. नंतर त्या मुलाने जे सांगितले ते संवेदना बधिर करणारे होते. त्याच्या लहानपणीच घर सोडून गेलेली आई, दररोज दारू पिऊन घरी आल्यानंतर त्याला मारणारे वडील अशा स्थितीत घरात राहायचे कसे, या प्रश्‍नाचं त्यानं शोधलेले उत्तर म्हणजे घराच्या बाहेर राहणे!

कांबळे आणि त्यांचा मित्र गोपाळ धोत्रे यांनी चार दिवस या मुलाचा पाहुणचारानंतर कांबळे चतुःशृंगी पोलिस ठाण्यात मदतीसाठी गेले. चतुःशृंगी पोलिस ठाण्याचे निरीक्षक दयानंद ढोमे आणि विजय कोळी यांनी बाल कल्याण समितीला तातडीने या मुलाच्या संरक्षणाबद्दल पत्र पाठविले. या समितीनेही त्याला बालगृहात पाठविले. कांबळे यांनी त्याला बालगृहात सोडले. 

पोलिसांच्या माध्यमातून समितीसमोर आलेल्या त्या मुलाला त्याची काळजी आणि सुरक्षीततेसाठी बालगृहात ठेवण्यात आले आहे. त्यासाठी सर्व कायदेशीर कागदपत्रांची पूर्तता केली.

तो जेमतेम दहा वर्षांचा आहे. त्याच्या पुढे संपूर्ण आयुष्य आहे. त्याला चांगले वळण लागणे, आयुष्यात चांगला माणूस करणे, याच उद्देशाने पोलिसांच्या मदतीने त्याला बाल कल्याण समितीकडे देण्यात आले.
- प्रदीप कांबळे, नागरिक

Web Title: Child Nursery Help Pradip kamble