हरविलेली बालके अखेर विसावली आईच्या कुशीत

राजेंद्रकृष्ण कापसे
गुरुवार, 8 ऑगस्ट 2019

खडकवासला धरणालगतच्या पुलावर मंगळवारी दुपारी एक मुलगी (वय साडेचार) रडताना पोलिसांना आढळली; तर दुसऱ्या घटनेत कर्वेनगर परिसरात मध्यरात्री दीड वर्षाचा मुलगा मंदिराजवळ नागरिकांना आढळला. पोलिस, नागरिकांच्या सतर्कतेमुळे ही मुले अवघ्या दोन-तीन तासांत त्यांच्या आईच्या कुशीत विसावली.

खडकवासला - खडकवासला धरणालगतच्या पुलावर मंगळवारी दुपारी एक मुलगी (वय साडेचार) रडताना पोलिसांना आढळली; तर दुसऱ्या घटनेत कर्वेनगर परिसरात मध्यरात्री दीड वर्षाचा मुलगा मंदिराजवळ नागरिकांना आढळला. पोलिस, नागरिकांच्या सतर्कतेमुळे ही मुले अवघ्या दोन-तीन तासांत त्यांच्या आईच्या कुशीत विसावली. 

दुपारी दीड दोनच्या सुमारास धरणालगतच्या पुलावर उत्तमनगर ठाण्याचे फौजदार अभिजित ढेरे बंदोबस्तासाठी होते. धरणातून सोडलेल्या पाण्याची छायाचित्रे नागरिक काढत होते. तेव्हा ढेरे यांना एक मुलगी रडताना दिसली. तिच्या नातेवाइकांचा शोध घेण्यासाठी ढेरे हे अर्धा एक किलोमीटर चालत गेले; परंतु नातेवाईक सापडले नाहीत. ते पुन्हा पुलावर परतले. उत्तमनगर ठाण्यात मुलीने प्रश्नांची उत्तरे दिली. दरम्यान, तिची आत्याही भाची हरविल्याची तक्रार देण्यासाठी एनडीए चौकीत आली होती. नंतर उत्तमनगर ठाण्यात मुलीची आईही पोचली. तिला पाहून वीरा आईकडे झेपावली. 

माणुसकी जपणाऱ्या युवकाचे कौतुक
कर्वेनगर - दीड वर्षाच्या मुलाला कर्वेनगर परिसरात वडील सोडून गेल्याची घटना घडली. परंतु एका युवकाने भरपावसात रडणाऱ्या त्या मुलाला कर्वेनगर पोलिस चौकीत नेले. तपासात तो मुलगा रहाटणीतील असल्याचे समजले. स्थानिक पोलिसांच्या मदतीने मुलगा अखेर आईच्या कुशीत विसावला.

पोलिस निरीक्षक प्रकाश खांडेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रणित सूर्यवंशी (वय २४  रा. थोरात कॉलनी, कर्वेनगर) रात्री दोन वाजता महालक्ष्मी मंदिराजवळून जात होता, तेव्हा मंदिराच्या पायरीवर चंद्रशेखर साधुचरण पुष्टी (वय दीड, रा. साईज्योत कॉलनी, रहाटणी) हा आढळला. त्याला घेऊन प्रणित कर्वेनगर चौकीत गेला. बीट मार्शल अमोल पायगुडे, बाबासो नरळे, भास्कर खोत, भावेश सोडमीशे यांनी नागरिक विभीषण मुंडे यांच्या मदतीने परिसरातील घरे पिंजून काढली. पण मुलगा कोणाचा याचा तपास लागला नाही. रहाटणीतील मुलगा हरविल्याची तक्रार महिलेने दिल्याचे कंट्रोलमार्फत समजले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Child Receive Mother Police Khadakwasala