व्हाइटनरऐवजी आता ‘सोल्यूशन’

Whitener-Solution-Addiction
Whitener-Solution-Addiction

भोसरी - काही वर्षांपूर्वी व्हाइटनरची नशा करण्याकडे लहान मुले, तसेच तरुणांचा कल होतो. त्याचे वाढते प्रमाण आणि धोके लक्षात घेऊन त्यावर बंदी आणली गेली. मात्र, व्हाइटरनची नशा करणारा वर्ग अलीकडे एका विशिष्ट प्रकारच्या सोल्यूशनकडे वळू लागला आहे; नव्हे तर त्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढताना पाहायला मिळत आहे. शहरातील काही झोपडपट्ट्यांचा वेध घेतला असता, त्या संदर्भातील अत्यंत हादरवून टाकणारी वस्तुस्थिती समोर आली.

भोसरीतील बालाजीनगर झोपडपट्टी त्यातील प्रातिनिधिक उदाहरण. आज येथील दहा ते बारा वयोगटातील ७० ते ८० मुले व्यसनाच्या या नव्या पर्यायाकडे वळली आहेत. शाळेला दांडी मारून भंगार वेचून, प्रसंगी भीकही मागून ही मुले हे व्यसन करताना पाहायला मिळत आहेत. परिणामी, या नशेमध्ये त्यांचे संपूर्ण बालपण करपत चालले असून, ज्या कोवळ्या हातात शालेय साहित्य असायला हवे, त्या हातात आता व्यसनांचे पदार्थ पाहायला मिळत आहेत.

बालाजीनगर झोपडपट्टीतील लोकसंख्या सात हजारांच्या आसपास. पुरुषांची संख्या चार हजार. पैकी ७५ टक्के पुरुष विडी, दारू, गांजाच्या आहारी गेलेले. काही महिलाही व्यसनाधीन. दिवसेंदिवस येथील लोकसंख्येची दाटी वाढत आहे. त्याच पटीत व्यसनाधीनताही. त्यातही लहान मुलांचे त्यातील प्रमाण हादरवून सोडणारे. प्रत्येक पावलावर व्यसन करणारी मुले येथे भेटतात. काही मुलांचे पालक कचरा वेचक, तर काही वेठबिगारीचे काम करतात. पोटाची खळगी भरण्यासाठी सकाळ लवकरच घराबाहेर पडतात. त्यानंतर ही मुले घरात एकटीच असतात. मोठ्यांचा वचक नसल्याने ते मन मानेल ते आणि तसे वागतात. अर्थात, त्यातूनही हे मुले व्यसनाधीन झाली आहेत. त्यासाठी वाट्टेल ते करण्याची तयारी असते. कधी भंगार गोळा करून, तर कधी भीक मागून ते नशा करतात. नशेच्या धुंदीत ही मुले इतरत्र पडलेलेही दिसतात. या मुलांचे भविष्य सुधारण्यासाठी झोपडपट्टीतील विविध अवैध धंदे बंद करण्याची मागणी येथील नागरिकांमधून होत आहे.

बालाजीनगर झोपडपट्टीत २२ ठिकाणी हातभट्टीची दारू विकली जाते. एका ठिकाणी गांजाही विकला जातो. त्यामुळे अनेक तरुणांना गांजा आणि दारूचे व्यसन लागले आहे. या व्यसनाधीन तरुणांना पाहूनच लहान मुले व्यसनाच्या आहारी जात आहे. पोलिसांनी येथील गुत्त्यांबरोबरच देशी दारूचे दुकानही बंद केले पाहिजे.
- महेंद्र सरवदे, सामाजिक कार्यकर्ते, बालाजीनगर

अपयश, प्रतिकूल वातावरणामुळे लहान मुले वेगळे जग शोधू लागतात. त्यातून ती विविध व्यसनांच्या आहारी जाऊ शकतात. मात्र अशा मुलांचे आणि त्यांचे पालकांचे योग्य समुपदेशन केल्यास ती व्यसनापासून दूर जाऊ शकतात. बालाजीनगरमधील सामाजिक कार्यकर्त्यांनी सहकार्य केल्यास अशा मुलांचे आणि त्यांचे पालकांचे मोफत समुपदेशन करण्यात येईल.
- डॉ. संदीप जगताप, मानसोपचारतज्ज्ञ

बालाजीनगरमधील मुले ज्या प्रकारचे व्यसन करत आहेत, त्या व्यसनामुळे त्यांच्या थेट मेंदूवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे त्याला आळा घालणे अत्यंत आवश्‍यक आहे. या परिसरातील सामाजिक कार्यकर्त्यांनी आमच्याशी संपर्क साधल्यास आम्ही तेथे येऊन या मुलांवर उपचार करू.
- मुक्ता पुणतांबेकर, उपसंचालक, मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्र, विश्रांतवाडी

व्यसनामुळे लिव्हर, पोट आणि मेंदूवर परिणाम होतो. लहान मुलांच्या मेंदूवर व्यसनामुळे कायमस्वरूपी परिणाम होऊ शकतो. भूक मंदावून रोगप्रतिकारशक्ती कमी होते. त्यामुळे अशी मुले सतत आजारी पडतात. कालांतराने ती कृश होतात. शिक्षणापासून दूर पळतात.  
 - डॉ. शंकर जाधव, वैद्यकीय उपअधीक्षक, यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय, पिंपरी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com