#ChildAbuse धार्मिक अनाथालयांसाठी आणतात बिहारमधील मुले

पांडुरंग सरोदे
सोमवार, 30 जुलै 2018

पुणे - कोणाच्या घरी पोटाची खळगी भरण्याची भ्रांत, तर कोणी आई-वडिलांपासून पोरकं झालेलं..जगण्याशीच जिथे दररोज लढा दिला जातो, तिथे शिक्षणाचा प्रश्‍न येतोच कुठे? बिहारच्या कानाकोपऱ्यातील अशाच कुटुंबांना केवळ तोंडओळख असलेल्या व्यक्ती धर्माच्या नावाखाली भूलवून त्यांची मुले पुण्यासह इतर शहरांतील धार्मिक अनाथालयामध्ये आणतात. प्रत्यक्षात या मुलांबाबत पोलिसांकडे नोंद केली जात नसल्याचे वास्तव आहे.

पुणे - कोणाच्या घरी पोटाची खळगी भरण्याची भ्रांत, तर कोणी आई-वडिलांपासून पोरकं झालेलं..जगण्याशीच जिथे दररोज लढा दिला जातो, तिथे शिक्षणाचा प्रश्‍न येतोच कुठे? बिहारच्या कानाकोपऱ्यातील अशाच कुटुंबांना केवळ तोंडओळख असलेल्या व्यक्ती धर्माच्या नावाखाली भूलवून त्यांची मुले पुण्यासह इतर शहरांतील धार्मिक अनाथालयामध्ये आणतात. प्रत्यक्षात या मुलांबाबत पोलिसांकडे नोंद केली जात नसल्याचे वास्तव आहे.

बिहार येथून हडपसरमधील एका मदरशामध्ये धार्मिक शिक्षण घेण्यासाठी ३ जुलै रोजी सहा मुले आली होती. मात्र, तेथील वातावरण मुलांना आवडले नाही. त्यामुळे सहा मुले त्याच दिवशी तेथून निसटल्याची घटना ताजी असतानाच कोंढव्यातील धार्मिक अनाथालयात मुलांचे लैंगिक शोषण झाल्याची घटना उघडकीस आली. संबंधित अनाथालयामध्ये बिहारमधील मुलांची संख्या जास्त असल्याचे निदर्शनास आले होते. या पार्श्‍वभूमीवर ही मुले कोठून आणली जातात, त्यांची कौटुंबिक पार्श्‍वभूमी काय, आई-वडील किंवा पालक मुलांना पाठविण्यास का तयार होतात? या संदर्भातील सविस्तर माहिती ‘सकाळ’ने घेतली आहे.

बिहार, उत्तर प्रदेश या राज्यांतून सर्वाधिक मुले धार्मिक अनाथालयांमध्ये पाठविली जातात. बिहारमधील अररीया, किसनगंज, पोनिया, सीतावल्ली, कटिहार, भागलपूर या सीमावर्ती भागातील तब्बल ८० टक्‍क्‍यांहून अधिक मुले पुण्यासह इतर शहरांमध्ये आणली जातात. आर्थिक स्थिती हलाखीची असल्याने कुटुंबीय मुलांना पाठविण्यास तयार होतात. या मुलांना पाठविताना बिहार प्रशासनाकडे कुठल्याही प्रकारची नोंद होत नसल्याचे प्रशासकीय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. याच पद्धतीने ही मुले पुण्यात आल्यानंतरही कोणत्याही प्रकारची कल्पना दिली जात नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.

मुलांना पाठविण्याची प्रमुख कारणे 
* कुटुंबीयांची हलाखीची परिस्थिती
* मुलांची देखभाल करण्यासाठी घरी कोणीही नसणे
* कुटुंबात मुलांची संख्या अधिक असणे
* अनाथालयात पाठविण्यासाठी पैसे देण्याची गरज न लागणे

आर्थिकदृष्ट्या कमकुवत कुटुंबातील मुले शिक्षणाचे कारण सांगून नेली जातात. मोठ्या शहरांत वसतिगृहासारख्या ठिकाणी त्यांना ठेवले जाते. तेथे त्यांना शिक्षण दिले जाते. काही अनाथालये चांगली आहेत. काही ठिकाणी मात्र मुलांवर अत्याचार होतात. त्याविषयी ते कोणाशीही बोलू शकत नाहीत. अखेर तेथून पळण्याशिवाय त्यांना मार्ग नसतो. 
- अजयकुमार उज्वलकुमार. नागरिक, पाटणा (बिहार)

आमच्या पोलिस ठाण्याच्या हद्दीतून काही मुले मदरशामधून पळून जाण्याची घटना नुकतीच घडली होती. मात्र, ही मुले त्यांच्या मूळ गावी गेल्याचे नंतर उघड झाले. त्या वेळी अशा पद्धतीने परराज्यांतून मुले इथे आणली जातात. या मुलांविषयीची माहिती पोलिसांना देणे गरजेचे आहे. त्यामुळे अनुचित घटना घडण्यास पायबंद घालणे शक्‍य होईल. 
- एस. आर. शिंदे, सहायक पोलिस निरीक्षक, वानवडी पोलिस ठाणे.

Web Title: #ChildAbuse Religious Orphanage bihar child