अरेरे! आजारपणात सोडली त्यांची मुलांनी साथ

Old-man
Old-man

पिंपरी - सख्ख्या भावाच्या मुलांना त्यांनी लहानाचे मोठे केले. त्यांचे शिक्षण झाल्यावर लग्नही लावून दिले. मात्र, ज्या व्यक्तीने त्यांच्यासाठी केले, ते आता आजाराने त्रस्त असून, खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. अशा वेळी मुलांनी त्यांची साथ सोडल्याने त्यांना आधारासह आर्थिक मदतीची नितांत गरज आहे. 

रॉबर्ट जोसेफ पाळंदे (वय ५३) असे या रुग्णाचे नाव आहे. ते गेल्या अनेक वर्षांपासून कासारवाडीत राहत आहेत. त्यांचे चार भावंडांचे कुटुंब होते. त्यापैकी दोन भावांचा मृत्यू झाला. त्यांचे मोठे भाऊ प्रभाकर पाळंदे हे राहुरी (जि. नगर) येथे राहतात. मात्र, त्यांनी वार्धक्‍यामुळे भावाची जबाबदारी घेण्यास असमर्थ असल्याचे रुग्णालयाला पत्राद्वारे कळविले आहे. त्यामुळे रॉबर्ट यांची काळजी घेण्यासाठी कुणीही नाही. रॉबर्ट हे शिलाईकाम करतात, असे त्यांचे शेजारी राहणारे संजय चव्हाण यांनी सांगितले.

कासारवाडी परिसरात २९ नोव्हेंबर रोजी ते अचानक चक्कर येऊन रस्त्यावर कोसळले. त्या वेळी तेथील रहिवासी वालचंद गायकवाड आणि अजय नायर यांनी त्यांना पिंपरी येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी नेले. त्यांच्या उपचारासाठी आतापर्यंत दोन लाख रुपये खर्च झाले आहेत. चव्हाण यांनीही उपचाराच्या खर्चाचा वाटा उचलला. पुढील उपचार करण्यासाठी त्यांना आर्थिक मदतीची गरज आहे. त्यामुळे चव्हाण व नायर यांनी त्यांच्या भावाच्या दोन मुली आणि मुलगा यांच्याशी संपर्क साधला. मात्र, त्यांनीही जबाबदारी घेण्यास नकार दिला.

ज्यांना सख्ख्या मुलांसारखे वाढविले, त्यांनीही पाठ फिरविल्याचे दुःख रॉबर्ट यांना सतावत आहे. आता त्यांना समाजाकडूनच आर्थिक मदतीची गरज आहे. त्यामुळे मदत करणाऱ्यांनी पिंपरी येथील डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटल ॲण्ड रिसर्च सेंटरमधील विकास कदम यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन संबंधितांनी केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com