‘बालपणीचे ते दिवस पुन्हा यावेत...’

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 14 नोव्हेंबर 2016

आपण वयाने कितीही मोठे झालो, तरी लहानपणीच्या आठवणी कधीही विसरता येत नाहीत. त्यामुळेच ‘ते दिवस पुन्हा यावेत’ असे प्रत्येकाला वाटते. जुन्या आठवणींनी कधी डोळे पाणावतात, तर कधी चेहऱ्यावर हास्य फुलवतात. अशाच काही मान्यवरांच्या आठवणी, त्यांच्याच शब्दांत... आजच्या बालदिनानिमित्त...

आपण वयाने कितीही मोठे झालो, तरी लहानपणीच्या आठवणी कधीही विसरता येत नाहीत. त्यामुळेच ‘ते दिवस पुन्हा यावेत’ असे प्रत्येकाला वाटते. जुन्या आठवणींनी कधी डोळे पाणावतात, तर कधी चेहऱ्यावर हास्य फुलवतात. अशाच काही मान्यवरांच्या आठवणी, त्यांच्याच शब्दांत... आजच्या बालदिनानिमित्त...

रिकामटेकडेपणातच नावीन्य  - अभिराम भडकमकर (लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेते)
‘कोल्हापूरमधील टेमलाबाईच्या जत्रेला लहानपणी आम्ही दरवर्षी जायचो. जत्रेत आवडत्या वस्तू घ्यायचो आणि घरी परतायचो. असंच एकदा जत्रेत फिरून आल्यानंतर आईने काय-काय पाहिलं, असं विचारलं. मग आम्ही तिला धम्माल केल्याचं सांगितलं. तिनं आम्हाला पुन्हा जत्रेत नेलं आणि एका ठिकाणी थांबविलं आणि पाहा म्हणाली. एक लहान मुलगी आपल्या पायाने पोळ्या लाटत होती... अन्‌ त्या तव्यावर टाकून भाजत होती. ‘त्या’ मुलीला दोन्ही हात नव्हते. ते दृश्‍य पाहून मी स्तब्ध झालो. ‘माणसात जिद्द असली की तो काय करू शकतो’, हा धडा त्या दिवशी आईने दिला. माझ्या लहानपणी टेलिव्हिजनचे फॅड फारसे नव्हते. त्यामुळे मैदानी खेळ खेळायला बराच वेळ मिळायचा. अभ्यासपूर्ण करून जो वेळ उरायचा तो ‘रिकामा’ वेळ. त्या वेळी आम्ही भरपूर मौजमजा करायचो, खेळायचो. त्याला ‘रिकामटेकडेपणा’ म्हटलं जायचं. परंतु आजच्या पिढीला हा रिकामटेकडेपणा अनुभवायला मिळत नाही. आता लहान मुलांचा संपूर्ण दिवस ‘बिझी’ असतो. त्यामुळे ते रिकामटेकडेपणा ‘मिस’ करतात, असं मला वाटतं. खरंतर या रिकामटेकडेपणातच नावीन्य दडलेलं असतं.’’

संस्कारामुळेच कलावंत म्हणून घडलो - श्रीधर फडके (गायक)
आमच्या घरात संगीताचे वातावरण होते, त्यामुळे लहानपणापासून मी या वातावरणात वाढलो. ग. दि. माडगूळकर, राजा परांजपे, लता मंगेशकर, आशा भोसले, महंमद रफी, मन्ना डे असे अनेक मान्यवर कलावंत घरी यायचे. त्यांच्यात आणि बाबूजींमध्ये होणारी सांगीतिक चर्चा, त्यांचे सुरेल स्वर माझ्या कानांवर पडायचे. इतकेच नव्हे, तर समोर कागद येताच पाच- सहा मिनिटांत बाबूजींकडून तयार होणारी चाल... असे अनुभव मला तीन- चार वर्षांचा असल्यापासून मिळत गेले. खरं तर हे सगळे प्रसंग मनावर कोरले गेले. त्या वेळी मी गात नव्हतो, चाली लावत नव्हतो; पण डग्गा वाजवायचो. त्यामुळे बाबूजी कधी- कधी ‘बस माझ्यासोबत’ म्हणायचे; पण गाण्याचे नकळत झालेले संस्कार आणि घरातील वातावरण यामुळे मी पुढे संगीतात रमू लागलो. त्या वातावरणाचा, संस्काराचा मला आजही उपयोग होतो. चाल कशी बांधावी, ती अधिक गोड कशी करता येईल... हे बाबूजी सांगायचे. त्यांनी बालपणी केलेले संस्कार कायम माझ्याजवळ आहेत. त्यातूनच कलावंत म्हणून मी घडत गेलो.

‘ती’ शिकवण आजही उपयोगी - जयंत नारळीकर (शास्त्रज्ञ)
मला शाळेत शिकत असतानाची एक घटना आठवतेय. ती घटना मी कधीच विसरू शकत नाही. म्हणून ती मला इथे तुम्हाला सांगावीशी वाटतेय. आमच्या शिक्षकांनी माझ्याकडे वर्गप्रमुखाची जबाबदारी दिली होती. एकेदिवशी ते शिक्षक वर्गावर आलेच नाहीत. शेवटचा तास होता, त्यामुळे विद्यार्थी गोंधळ करू लागले. काही विद्यार्थ्यांनी ‘सगळे लवकर घरी जाऊ’चा तगादा लावला, त्यामुळे मी वर्गप्रमुख या नात्याने सर्व मुलांना घरी जाण्याची परवानगी दिली. दुसऱ्या दिवशी ही बाब मुख्याध्यापकांना समजली. त्यांनी मला त्यांच्या खोलीत बोलावले. ‘मुख्याध्यापकांची परवानगी न घेता मुलांना घरी जाण्याची परवानगी का दिली?’ असा प्रश्‍न विचारला. प्रश्‍न विचारून मुख्याध्यापक थांबले नाहीत. त्यांनी वर्गप्रमुखाच्या जबाबदारीची जाणीवही मला करून दिली. जेव्हा आपल्याकडे काही अधिकार येतात, आपल्या खांद्यावर जबाबदारी पडते, त्या वेळी तुम्ही निर्णय कसे घेता, हे खूप महत्त्वाचे असते. मुख्याध्यापकांनी बालपणी दिलेली ती शिकवण मला आयुष्यात वेगवेगळ्या टप्प्यांवर, वेगवेगळ्या पदांवर काम करताना उपयोगी पडली.

Web Title: childrens day