अक्षरमधून ओळख अक्षरांची 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 13 नोव्हेंबर 2019

शहरात अमरावती, नगर, बीड या जिल्ह्यांतून रोजगाराचा शोध घेत दिघीतील पालावर अनेक कुटुंबे दाखल होतात. स्थलांतरित कामगार पोटाची खळगी भरण्यासाठी भटकंती करताना लेकरांच्या शिक्षणासाठी जागरूक नसल्याचे प्रा. इंगळे यांच्या निदर्शनास आले. पालावर, वस्त्या, तांडे, गावकुसाबाहेर, मजूर अड्ड्यावर हजारो लेकरे पालकांचे अज्ञान व आर्थिक परिस्थितीमुळे मोफत व सक्तीच्या शिक्षणापासून वंचित असल्याचे प्रा. इंगळे यांच्या लक्षात आले व त्यांनी नोकरी सोडली. त्यांनी दिघीत "अक्षर पालावर'ची शाळा 2012 मध्ये सुरू केली.

पिंपरी : बांधकाम मजूर, मेंढपाळ, नंदीवाले, बहुरूपी, फासेपारधी आदींची पोटासाठी भटकंती ठरलेलीच असते. रोजगारासाठी स्थलांतरित झालेल्या या माय-बापाच्या मागे फिरत दिवसभर मातीवर रेघोट्या ओढत बालपण जगणाऱ्या शेकडो हातात लेखन-पाटी आल्याने त्यांच्या आयुष्याची नवी पहाट उजाडली आहे. दिघीत प्रा. दत्तात्रेय इंगळे यांनी गेल्या आठ वर्षांपासून सुरू केलेल्या "अक्षर' शाळेत आज हजारो मुले आनंदाने "अ, ब, क, ड'चे धडे गिरवत आहेत. 

शहरात अमरावती, नगर, बीड या जिल्ह्यांतून रोजगाराचा शोध घेत दिघीतील पालावर अनेक कुटुंबे दाखल होतात. स्थलांतरित कामगार पोटाची खळगी भरण्यासाठी भटकंती करताना लेकरांच्या शिक्षणासाठी जागरूक नसल्याचे प्रा. इंगळे यांच्या निदर्शनास आले. पालावर, वस्त्या, तांडे, गावकुसाबाहेर, मजूर अड्ड्यावर हजारो लेकरे पालकांचे अज्ञान व आर्थिक परिस्थितीमुळे मोफत व सक्तीच्या शिक्षणापासून वंचित असल्याचे प्रा. इंगळे यांच्या लक्षात आले व त्यांनी नोकरी सोडली. त्यांनी दिघीत "अक्षर पालावर'ची शाळा 2012 मध्ये सुरू केली. 

मुलांमध्ये शिक्षणाची गोडी निर्माण व्हावी, यासाठी पालावर जाऊन पालकांना शैक्षणिक माहिती दिली. तसेच, मुलांना वयानुसार जवळच्या सरकारी शाळेत प्रवेश मिळवून दिला. त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन, शैक्षणिक साहित्य देऊन शिक्षण प्रवाहात टिकवून ठेवले. ते भोसरी माध्यमिक शाळेतील इंग्रजी विषयाचे शिक्षक म्हणून कार्यरत होते. 

125 मुलांना दिला प्रवेश 
रोजगारासाठी भटकंती करणाऱ्यांचे राहण्याचे ठिकाण स्थिर नसल्याने त्यांच्या मुलांचे भविष्य अंधकारमय होते. अशांचा शोध घेऊन त्यांना वयानुसार शाळेत दाखल केले जाते. त्यांची अक्षर शाळेत सायंकाळी रोज दोन तास शिकवणी घेतली जाते. त्यांना पत्नी सारिका यांची मदत मिळते. त्यांनी आत्तापर्यंत 125 मुलांना प्रवेश घेऊन दिला आहे. 

"स्नेहछाया' 
कोणाचे आणि कुठलेही मूल केवळ परिस्थितीमुळे शिक्षणापासून वंचित राहू नये आणि उपाशी पोटी झोपू नये, यासाठी मी झटत आहे. विनायक पार्क येथे कैलास बोरसे यांनी उपलब्ध करून दिलेल्या जागेत "स्नेहछाया' प्रकल्पातून "आपलं घर' उपक्रम सुरू आहे. यात वंचित, स्थलांतरित, आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील, आदिवासी, ठाकर, कातकरी, पारधी, भिल्ल, भूमिहीन, मजूर, आर्थिक दुर्बल विधवा, विधुर यांच्या मुलांना दत्तक घेऊन त्यांचे शिक्षण, संगोपन व कौशल्य विकास करण्यात येत आहे. संस्था, समाजातील दानशूर व्यक्ती व उद्योजकांच्या मदतीने हा उपक्रम सुरू असल्याचे प्रा. इंगळे यांनी सांगितले. 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: childrens day special