#Children'sDay संवाद हरवतो आहे...

#Children'sDay संवाद हरवतो आहे...

संवाद एक अशी गोष्ट की, ज्याच्याशिवाय आपले दैनंदिन जीवनसुद्धा अवघड होऊन बसेल. दोन व्यक्तींमधील नात्यांचा पाया म्हणजे संवाद. संवादाच्या अनेक पद्धती आहेत. तरीही त्याचे महत्त्व सर्वांना समजतेच असे नाही. आजच्या धक्काधकीच्या जीवनात संवादाची जागा सोशल मीडिया, मोबाईल इत्यादींनी घेतली आहे. आई-वडील मुलाला बागेत खेळायला घेऊन येतात. तो चेंडूशी खेळत, झोक्‍यावर बसत आपले मन रमवत असतो. आई-वडील मात्र आपापल्या मोबाईलमध्ये व्यग्र असतात. ना एकमेकांशी बोलणं होते ना आनंदी आठवणी तयार होतात. कुटुंबातले मानसिक स्वास्थ्य हरवते व उरते ते फक्त मोबाईलचे मायाजाल. काही वेळा दैनंदिन गोष्टींमध्ये आपण इतके व्यग्र होतो की, आपण नक्की कशास मुकतो आहोत हे देखील आपल्याला समजत नाही. सोशल मीडियाच वापर महत्त्वाचा आहेच, पण तो किती करायचा हे समजणेदेखील महत्त्वाचे आहे. मोबाईलवरचा संवाद आणि प्रत्यक्षात साधलेला संवाद यांमध्ये असलेला जमीन-अस्मानाचा फरक वेळीच लक्षात आल्यास अनेक समस्या दूर होतील. लहानपणी आजीने सांगितलेल्या गोष्टी, तिसरा लाडू घेताना आईने मुलाकडे बघून केलेला लाडिक रागीट चेहरा, मुलाला वडिलांनी दिलेले लेक्‍चर, बाबांची बोलणी खाल्ल्यावर ऐकलेले आजोबांचे समजुतीचे बोल या संवादांमधील मजा व्हॉट्‌सॲपवरच्या इमोजीमध्ये कधीच येऊ शकत नाही. संवाद आणि सोशल मीडिया ही दोन्ही माणसाला मिळालेली वरदाने आहेत, पण त्याचा नेमका वापर कसा करायचा हे ज्याला कळेल, तो जगी सर्वसुखी होईल. 

पाण्यामुळेच जीवन 
सध्या महाराष्ट्रात दुष्काळी परिस्थिती आहे. त्यामुळे, पाण्याची बचत अत्यंत महत्त्वाची आहे. म्हणतात ना, ‘पाणी आहे तर जीवन आहे.’ पाण्यामुळेच पीके येतात. अनेक प्रकारचे उद्योग चालतात. अन्न तयार होते. त्यामुळे आपल्याला हे जीवन वाचवावेच लागेल. नदी, तलाव आदी अनेक स्रोतांतून पाणी आपल्याला मिळते. शहरात नळांद्वारे पाणीपुरवठा होतो. मात्र, अनेक ठिकाणी नळ सुरू राहिल्याने पाणी वाया जाते. गरजेपुरते पाणी घेऊन नळ लगेच बंद केला पाहिजे. पाण्याची हीच बचत आपल्याला उन्हाळ्यात मदतीला येते. पाणी मौल्यवान असून आपण ते जपून वापरूयात. खेडेगावात पाण्यासाठी लोकांना दूरवर जावे लागते. अनेक तास रांगेत उभा राहावे लागते. आपण शहरातील लोकांनी ही जाणीव ठेवून पाण्याचा वापर केला पाहिजे.

आम्ही खेळायचे कुठे?
‘आदिती खेळायला चल,’ माझ्या मैत्रिणीचा आवाज आला. मी खेळायला निघाले. तेवढ्यात आईचा आवाज आला, ‘‘रस्त्यावर जास्त पळू नको! पळापळी करू नका.’’ मी म्हटले, ‘‘आता खेळ म्हणजे पळापळी ही आलीच ना?’’ आई म्हणाली,‘‘ हो गं बाई! पण काळजी वाटते ना, रस्त्यावर किती गाड्या असतात.’’ आईचंही बरोबर आहे म्हणा. रस्त्यावर किती गाड्या असतात आणि मैदानावर खेळायचे म्हटले तर शहरी भागात मैदान हा शब्द ऐकूच येत नाही. मैदानेच नाहीत. जी मैदाने होती ती पण इमारती बांधण्यासाठी वापरतात. कुठे खेळायला गेले तर आई-बाबा म्हणतात, ‘‘जपून खेळ हं! कोणाच्या घराच्या खिडक्‍या फोडू नको.’’ गावाकडे खेळायला किती जागा आहे. किती मैदाने आहेत. तिथे प्रदूषणही नाही. सगळीकडे हिरवीगार झाडे आहेत. त्यामुळे तिथे खेळायलाही जागा आहे. शहरात प्रदूषण, वाढती लोकसंख्या व त्यातच आणखी भर म्हणजे गावाकडील लोक कामानिमित्त शहरात येतात. त्यामुळे इमारती बांधाव्या लागतात. जिथे मोकळी जागा मिळेल तिथे इमारती बांधतात. त्यामुळे खेळायला मैदानेच नाहीत. मला असे वाटते की, जेवढ्या इमारती गरजेच्या आहेत तेवढीच मैदानेही गरजेची आहेत. मैदानावर आपण शारीरिक खेळ खेळतो. त्यामुळे आपला व्यायाम होतो व आपले शरीर निरोगी बनते. खेळामुळे मानसिक आरोग्यावर होणाऱ्या सकारात्मक परिणामांकडे आता जगभरातल्या आरोग्याशी निगडित असलेल्या सर्वच घटकांचे लक्ष या खेळाकडे वेधले गेले आहे. आता आपल्याला ‘पढोगे लिखोगे बनोगे नवाब, खेलोगे कुदोगे बनोगे खराब’ ही म्हण खोटी ठरवावी लागेल. खेळाचे खूप फायदेही आहेत. त्यामुळे मुलांना खेळायला मैदाने हवीच!

हक्काचे घर
भटके कुत्रे!... आजच्या घडीला भेडसावणारा एक प्रश्‍न. पण कोणी जाणून घेतले का आमच्या कुत्र्यांचे प्रश्‍न? तुम्हाला प्रश्‍न पडला असेल, एवढे बोलणारा मी कोण? मी बॉबी. गुप्ते यांच्या घरातला एक कुत्रा. मला त्यांनी घरी आणलं, तो माझ्या आयुष्यातला सगळ्यात छान दिवस होता. मी एका कुत्र्याच्या संस्थेमधून गुप्त्यांच्या मोठ्या घरात आलो. मी घरात सुखानं राहायला लागलो. एके रात्री खूप थंडीमुळं मला मऊ ब्लॅंकेटमध्ये गुंडाळलं गेलं. रोज सकाळी छान नाष्टा मिळायचा. माझ्यासारखा नशीबवान मीच, असं मला वाटलं. रस्त्यावरून माझ्या मालकांबरोबर चालताना सगळ्या कुत्र्यांना माझा हेवा वाटे. मला तर ‘लय भारी’ वाटायचं, आता आपलं आयुष्य सेट झालं, असंही वाटायचं. पण...एक दिवस मला अचानक चक्कर आली. प्राण्यांच्या डॉक्‍टरांनी मला गंभीर आजार झाल्याचं सांगितलं. माझ्यामुळे घरातल्या सगळ्या माणसांना इन्फेक्‍शन होईल, असंही म्हणाले. त्याच क्षणी मालकांनी मला रस्त्यावर टाकलं. रडत-रडत मी पूर्ण रात्र काढली. मला खूप वाईट वाटलं, की मी ज्यांच्यावर एवढं प्रेम केलं त्यांनी मला एका क्षणात दूर केलं. माझ्यासोबत रस्त्यावर आणखीही कुत्री होती. कोणी म्हातारे तर कोण अपंग. कोणाला आजार झाला म्हणून त्यांच्या मालकांनी त्यांना टाकून दिलं होतं. ही माणसं असं का करतात? सांभाळायचं नसतं तर आम्हाला घेतातच का? माणसं आम्हाला राग आला तर मारतात, दिवाळीत आमच्या शेपटीला फटाके लावतात आणि आम्ही चावलो तर त्याचा कांगावा करतात. रस्त्यावरून जाणारे काहीजण आम्हाला खाऊ देतात, पण, आम्हाला हवं ते हक्काचं घर आणि प्रेम कोणीच देत नाही. मला एकच प्रश्‍न विचारावासा वाटतो, माझ्यासारख्या आजारी असलेल्या, म्हातारे किंवा अपंग झालेल्या रस्त्यावरच्या कुत्र्यांना मिळंल का एक हक्काचं घर?


माझा प्रवास
आमचा बऱ्याच दिवसांपासून कुठेतरी प्रवासाला जायचा बेत होता. त्या फिरण्यामध्ये त्या भागाची सांस्कृतिक, नैसर्गिक आणि ऐतिहासिक माहिती जाणून घेण्याचा उद्देश होता. त्यासाठी आम्ही केरळची निवड केली. आम्ही विमानाने गेलो. पुणे ते कोचीन असा हा दोन तासांचा प्रवास होता. पहाटे साडेचार वाजता आम्ही कोचीनच्या विमानतळावर पोचलो. तेथून चारचाकी गाडीने आम्ही मुन्नार या हिलस्टेशनला निघालो. मुन्नार हे एक उंचावर असलेले पर्यटनस्थळ आहे. संपूर्ण घाटरस्ता व दोन्ही बाजूंना उंचच उंच व भव्य असे वृक्ष. जिकडे नजर जाईल तिकडे हिरवाईने नटलेल्या डोंगर दऱ्या आपणाला दृष्टीस पडतात, त्यामध्ये रबराची झाडे व तिथे रबराची शेतीदेखील करतात. तेथील स्थानिक शेतकरी लवंग, विलायची, काळी मिरी, दालचिनीची शेती करतात. आम्ही मोठमोठाले चहाचे मळेही पाहिले. आपल्याकडे मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पाण्याचा दुष्काळ असतो. तिकडे मात्र रस्त्याच्या कडेने मोठमोठाले धबधबे वाहत होते. तेथे जेवणासाठी तांदळापासून तयार होणारे पदार्थ म्हणजे, इडली, अप्पम, डोसा, उत्तपा होते. हे सर्व आम्हाला केळीच्या पानावरती वाढलेले होते. दुसऱ्या दिवशी आम्ही मीनाक्षी मंदिर, पद्मनाभन मंदिर पाहिले. आम्ही हत्तीवरून जंगल सफारीदेखील केली. ज्या ठिकाणी अवघड रस्ते आहेत तिथे ते आम्हाला जीपने घेऊन जात असत. त्याला ऑफ रोड साइड सिईंग म्हणतात. तेथील लोक साधी राहणी व अगत्यशील आणि प्रेमळ आहेत. तेथे बॅक वॉटर आणि नदीचे पाणी जेथे समुद्राला मिळते येथे बोटिंगसाठी आम्ही गेलो. त्यानंतर आम्ही कन्याकुमारी येथील विवेकानंदांचे स्मारक पाहण्यासाठी समुद्रामध्ये जवळजवळ २ किलोमीटर आत बोटीने जावे लागते. तेथे विवेकानंदांची आकर्षक, उभी मूर्ती आहे. ध्यानधारणेसाठी एक खोली आहे व त्याच्या दुसऱ्या बाजूला पुस्तकांचे मोठे दालन आहे. आम्ही तेथून कोचीन विमानतळावर परतलो. रात्रीच्या विमानाने पुण्याला परतलो. 

***********************************************

अतिथी संपादकीय

***********************************************
अभ्यास बोअरिंग  का वाटतो?

अभ्यास बोअरिंग का आहे, असे प्रश्‍न मुलांना बहुधा पडतात. मुलांना अभ्यास करताना खूप बोअर होत असते. अभ्यासात लक्ष लागत नाही. आजच्या पिढीला शिकण्याची खूपच गरज आहे; पण मुलांवर पालक, शिक्षक व क्‍लासेसकडून अभ्यास करण्यासाठी मोठा दबाव टाकला जातो. त्यांच्या वयाच्या मानाने अभ्यासाचा हा ताण त्यांच्यासाठी खूपच जास्त असतो. त्यामुळे अभ्यासात त्यांचे लक्ष जात नाही आणि मुले टेंशन घ्यायला लागतात. घरच्यांचे प्रेशर असते की, तुझ्या मित्राला जास्त मार्क पडले, मग तूच मागे कसा? तुला आम्ही सर्व सोयी पुरवतो, मग तुलाही चांगले मार्क पडायलाच पाहिजेत. आई-वडील आपल्या मुलांची दुसऱ्या मुलांशी तुलना करतात व त्यामुळेच मुलांचा आत्मविश्‍वास कमी होतो. अभ्यासात लक्ष लागत नाही. अभ्यास हेच संकट वाटायला लागते. 

अभ्यासामध्ये प्रयोग, ॲक्‍टिव्हिटी व खेळ यांचा समावेश केला पाहिजे. आपल्याला ज्या विषयात गती आहे, त्यामध्येच जास्त शिक्षण मिळाले पाहिजे. प्रत्येकाची अभ्यास करण्याची क्षमता वेगळी असते. त्यामुळे परीक्षेत कमी-जास्त मार्क मिळतात, पण काही वेळा आई-वडील ते समजून घेत नाहीत. मुलांना अभ्यास नकोसा वाटत जातो व त्यांना वाटते, ‘अभ्यास करून आपल्याला काय मिळते? त्याचा काय उपयोग आहे? कशासाठी आपण अभ्यास करायचा?’ तसे पाहिल्यास अभ्यास आपल्यासाठी खूप महत्त्वाचा असतो, आपल्याला आयुष्यात चांगली नोकरी व सुखाचे जीवन जगण्यासाठी अभ्यासाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. आई-वडिलांनी आपल्या मुलांना समजून त्यांच्यावर जबाबदारी टाकायला पाहिजे. मन लावून व लक्ष केंद्रित करून आपण अभ्यास करत राहिल्यास आपल्याला अभ्यास करणे बोअर न होता तो एक आनंददायी अनुभव होईल. आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनाचा एक महत्त्वाचा भाग समजून आपण अभ्यास करायला शिकले पाहिजे. यात पालक व शिक्षकांनीही महत्त्वाची भूमिका बजावावी, ही अपेक्षा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com