विद्यार्थी झाले अतिथी संपादक

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 14 नोव्हेंबर 2018

पिंपरी - वृत्तपत्र म्हणजे काय?..., ते कसे छापले जाते?..., बातम्या कुठून मिळतात?..., मीडियाविषयी आस्था..., त्याच्या कार्यपद्धतीविषयी जाणून घेण्याची जिज्ञासा... याबाबत चेहऱ्यावर कुतूहल..., असे वातावरण ‘सकाळ’च्या पिंपरी कार्यालयाने मंगळवारी (ता. १३) अनुभवले. निमित्त होते ‘सकाळ एनआयई’तर्फे बाल दिनानिमित्त आयोजित ‘बाल अतिथी संपादक’ उपक्रमाचे. 

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर देण्यासाठी ‘सकाळ एनआयई’तर्फे आयोजित उपक्रमात अनेक शाळांमधील विद्यार्थी व शिक्षक सहभागी झाले होते. त्यांनी वृत्तपत्रांची नेमकी भूमिका काय, कार्य कसे चालते, वृत्तांकन कसे करावे, संपादन प्रक्रिया कशी असते, वृत्तपत्राची मांडणी, जाहिराती अशा वृत्तपत्रांच्या कार्यशैलीची माहिती जाणून घेतली. संपादकीय, जाहिरात, वितरण यांसह विविध विभागांना भेट देऊन शंकांचे निरसन केले. ‘सकाळ’चे सहयोगी संपादक अविनाश चिलेकर, मुख्य व्यवस्थापक (जाहिरात) मिलिंद भुजबळ यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. बातमीदार होण्यासाठी आवश्‍यक कौशल्ये व गुण वैशिष्ट्यांचे विश्‍लेषण केले. 

विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कामाचा अनुभव मिळावा, यासाठी ‘सकाळ’मध्ये प्रकाशित झालेल्या बातम्यांची कात्रणे घेऊन प्रात्यक्षिकाद्वारे अंकाची मांडणी केली. काही विद्यार्थ्यांनी संपादक, उपसंपादक आणि बातमीदारांची भूमिका पार पाडली. या आगळ्यावेगळ्या उपक्रमाने विद्यार्थी भारावून गेले. माध्यमांविषयी माहिती जाणून घेण्याची संधी दिल्याबद्दल त्यांनी ‘सकाळ’चे आभार मानले. 

सहभागी शाळा
नवमहाराष्ट्र विद्यालय (पिंपरी), एच. ए. विद्यालय (पिंपरी), शिक्षण प्रसारक मंडळी मराठी माध्यम शाळा (निगडी), मॉडर्न हायस्कूल (निगडी).

Web Title: Childrens Day Student gets guest editor