esakal | पाठ्यपुस्तकाविना यंदा होणार मुलांची शाळा सुरू
sakal

बोलून बातमी शोधा

school

पाठ्यपुस्तकाविनाच यंदा होणार मुलांची शाळा सुरू

sakal_logo
By
मीनाक्षी गुरव @GMinakshi_Sakal

पुणे : शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना दरवर्षी पाठ्यपुस्तके दिली जातात. मात्र, यंदा मे महिना संपत आला, तरीही अद्याप महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाचे (बालभारती) पाठ्यपुस्तक छपाईचे काम पूर्ण झाले नसल्याने विद्यार्थ्यांची शाळा पाठ्यपुस्तकाविनाच सुरू होणार असल्याचे चित्र आहे. राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागातर्फे समग्र शिक्षा अभियानातंर्गत विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके उपलब्ध करून दिली जातात. त्यासाठी बालभारतीकडून तब्बल नऊ कोटी पाठ्यपुस्तकांची छपाई केली जाते. मात्र यंदा छपाईसाठी लागणाऱ्या कागदाच्या खरेदीवर न्यायालयात याचिका प्रलंबित आहे. त्यावर अद्याप निर्णय झालेला नाही. त्यामुळे यंदा शाळा सुरू होईपर्यंत म्हणजेच १४ जूनपर्यंत पुस्तके उपलब्ध होणार नसल्याचे दिसून येते. मात्र, सध्या बालभारतीकडे मागील वर्षीचा पुस्तकांचा काही साठा शिल्लक आहे, त्याशिवाय साठा म्हणून उपलब्ध असलेल्या कागदाचा वापर करून पुस्तकांची छपाई केली जाणार आहे. परंतु शाळेत जाणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांच्या हातात पाठ्यपुस्तक असेलच असे यंदा होणार नाही.

हेही वाचा: पिंपरी-चिंचवडमध्ये आज ५३७४ जणांना डिस्चार्ज तर ६४१ नवीन रुग्ण

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गेल्यावर्षीप्रमाणेच यंदाही शाळा ऑनलाइनद्वारेच सुरू होणार आहेत. गेल्यावर्षी विद्यार्थी शाळेत आले नसले, तरीही त्यांना पाठ्यपुस्तके घरपोच देण्यात आली होती. यंदाही असेच चित्र पहायला मिळणार आहे. मात्र, शाळा सुरू होताना, राज्यातील प्रत्येक विद्यार्थ्यांच्या हातात पाठ्यपुस्तक असेल का! हे अद्याप निश्चितपणे सांगणे अवघड आहे. दरम्यान बालभारतीच्या अधिकृत संकेतस्थळावरून (ई-बालभारती) ई-पाठ्यपुस्तके पीडीएफ स्वरूपात डाऊनलोड करण्याची सुविधा उपलब्ध असणार आहे. गेल्यावर्षी तीन कोटीहुन अधिक पुस्तके डाऊनलोड करण्यात आली होती.

हेही वाचा: पुणे महापालिका, ZPची म्युकरमायकोसिस रुग्णांची शोधमोहिम

‘‘पाठ्यपुस्तक छपाईसाठी लागणाऱ्या कागदाच्या खरेदीसंदर्भात न्यायालयात याचिका दाखल आहे. मात्र, आतापर्यंत पाठ्यपुस्तक छपाईचे ६०-६५ टक्के काम पूर्ण झाले आहे. उर्वरित काम शाळा सुरू होण्यापूर्वी पूर्ण करण्यात येईल. शाळा सुरू होण्यापूर्वी विद्यार्थ्यांच्या हाती पाठ्यपुस्तके पोचविण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत.’’

- दिनकर पाटील, संचालक, बालभारती

‘बालभारती’तर्फे दरवर्षी साधारणत : नऊ कोटी पाठ्यपुस्तकांची छपाई आणि वितरण करण्यात येते. यंदा समग्र शिक्षा अभियानातंर्गत केवळ सात कोटी पुस्तकांचे वितरण करण्यात येणार आहे. मागील वर्षाची जवळपास दोन कोटी पुस्तके बालभारतीकडे शिल्लक आहेत. तर यंदा तीन कोटीच्या आसपास पाठ्यपुस्तकांची छापाई करण्यात येत आहे. अभियानातंर्गत वितरणासाठी दोन कोटी पुस्तकांचा तुटवडा जाणविणार असल्याची चिन्हे आहेत.

हेही वाचा: पुणे महापालिका, ZPची म्युकरमायकोसिस रुग्णांची शोधमोहिम