पुन्हा "हुडहुडी' भरणार

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 21 नोव्हेंबर 2016

पुणे ः शहरात गेल्या आठवड्यापासून थंडी जाणवत नव्हती, ती आता पुन्हा जाणवू लागली आहे. पुढील सहा दिवसांमध्ये आकाश निरभ्र राहणार असून, किमान तापमान दहा ते अकरा अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहील, असा अंदाज हवामान खात्यातर्फे वर्तविण्यात आला आहे. शहरात रविवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंत किमान तापमानाचा पारा 9.9 अंश सेल्सिअसपर्यंत घसरला होता. राज्यात सर्वांत कमी तापमान नाशिक येथे 9.5 अंश सेल्सिअस नोंदले गेले.

गेल्या आठवड्यात कोकण किनारपट्टीपासून ते श्रीलंकेपर्यंत कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले होते. त्यामुळे कोकण आणि मध्य महाराष्ट्रात स्थिरावत असलेली थंडी कमी झाली होती. राज्यातील किमान तापमानाचा पारा सरासरीपेक्षा वाढला होता. या हवामानात गेल्या चोवीस तासांपासून बदल होऊ लागला आहे. शहरात किमान तापमानाचा पारा सरासरीपेक्षा 4.4 अंश सेल्सिअसने घसरून 9.9 अंश सेल्सिअस नोंदला गेला आहे. पुढील सहा दिवसांमध्येही थंडी कायम राहणार असल्याचे हवामान खात्यातर्फे सांगण्यात आले.
राज्यात थंडी वाढली
मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भाच्या उर्वरित भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाली. विदर्भातील काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय घट झाली. उर्वरित भागात किमान तापमान सरासरीच्या जवळपास होते.
नैर्ऋत्य बंगालच्या उपसागरात श्रीलंकेच्या किनाऱ्याजवळ कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्‍यता आहे. त्याचा परिणाम म्हणून उत्तर भारतात थंडी वाढू शकते, तर राज्यात गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहण्याची शक्‍यता आहे. पुण्याच्या आसपासच्या परिसरात येत्या बुधवारपर्यंत आकाश निरभ्र राहण्याची शक्‍यता आहे.

Web Title: chilly cold again in pune