राष्ट्रवादीच्या नेत्यांनी समजूत काढल्यानंतरही राहुल कलाटे अपक्ष लढणार! : Chinchawad ByElection | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rahul-Kalate

Chinchawad ByElection: राष्ट्रवादीच्या नेत्यांनी समजूत काढल्यानंतरही राहुल कलाटे अपक्ष लढणार!

चिंचवड पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादीनं नाना काटे यांना उमेदवारी दिली आहे. पण आपल्याला उमेदवारी मिळेल ही आशा फोल ठरल्यानंतर आता राहुल कलाटे यांनी अपक्ष अर्ज भरण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला, पण तरीही कलाटे आपल्या निर्णयावर ठाम असून आपल्या समर्थकांसह ते अर्ज भरण्यासाठी निघाले आहेत. (Chinchawad ByElection Rahul Kalate will fight as an independent after leaders of NCP tring to agreed him)

राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके यांनी थोड्यावेळापूर्वी राहुल कलाटे यांची भेट घेऊन अर्ज दाखल न करण्यासाठी त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. पण कलाटे हे आपल्या निर्णयावर ठाम असून ते आपल्या समर्थकांसह अपक्ष अर्ज दाखल करण्यासाठी रवाना झाले आहेत.

मी महापालिकेत शिवसेनेचा गटनेता म्हणून काम करतो आणि शिवसेनेचा नगरसेवक आहे. परंतू मी महाविकास आघाडीकडं उमेदवारी मागितली होती. चिंचवडसाठी माझा विचार केला जाईल अशी माझी अपेक्षा होती. कारण २०१९च्या निवडणुकीत मी शिवसेनेचा बंडखोर म्हणून अपक्ष निवडणूक लढवली होती. यावेळी जनतेनं मला भरभरुन मतं दिली होती. त्यावेळी मला १ लाख १२ हजारांवर मतं दिली होती. त्यांचा माझ्यावर खूप मोठा विश्वास होता, असंही यावेळी कलाटे यांनी म्हटलं आहे.

महाविकास आघाडी म्हणून आपण लढुयात असं मला अजित पवारांनी आणि सुनील शेळके यांनी सांगितलं. तसेच राष्ट्रवादीचे उमेदवार नाना काटे यांच्यासोबत शिवसेनेचे शहर अध्यक्ष अर्ज भरण्यासाठी गेले आहेत. यावर बोलताना शिवसैनिक माझ्या बरोबर आहेत, असं यावेळी कलाटे यांनी म्हटलं आहे.

टॅग्स :Pune NewsChinchwadNCP