
Chinchwad By-Election : "शंकरशेठ मला मुलासारखे, विरोधकांना..." ; उमेदवारी मिळाल्यानंतर अश्विनी जगतापांची प्रतिक्रिया!
पुण्यातील चर्चेतील पोटनिवडणुक कसबा आणि चिंचवडमध्ये भाजपने उमेदवार जाहीर केले आहेत. हेमंत रासने यांना कसब्यातून भाजपकडून उमेदवारी घोषित करण्यात आली आहे. तर चिंचवडमध्ये अश्विनी जगताप यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
चिंचवड विधानसभा मतदारसंघातील भाजपाचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांच्यावतीने त्यांच्या एका महिला कार्यकर्त्याने काल गुरुवारी (ता. २) चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक कार्यालय असलेल्या ‘ग’ क्षेत्रीय कार्यालयातून अर्ज नेला होता. दरम्यान अश्विनी जगताप यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.
उमेदवारी जाहीर झाल्यानंतर अश्विनी जगताप यांची पहिली प्रतिक्रिया आली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. माझे कुटुंब माझ्याबरोबर आहे. शिंदे गट, भाजप कर्यकर्ते, आरपीआय या सर्वांचा मला पाठींबा आहे. संपूर्ण पिंपरी चिंचवड माझ्याबरोर असताना मला एकटी असल्याची कशाचीही भीती वाटत नाही, असे अश्विनी जगताप म्हणाल्या.
अश्विनी जगताप म्हणाल्या, माझी विरोधकांना हात जोडून विनंती आहे. त्यांनी माझ्या घरात वाद असल्याचे वावटळ उठवले आहे. माझ्या घरात कोणतेही वाद नाहीत. शंकरशेठ मला मुलासारखे आहेत. साहेब (लक्ष्मण जगताप) आणि मी नेहमी म्हणायचो, मला एक मुलगी नाही आम्हाला सहा मुलं आहेत.
गेली तीस वर्ष झाली आमचं एकत्र कुटुंब आहे. प्रत्येक निर्णय आम्ही एकत्र घेतला, मुलींचे लग्न देखील एकत्र कुटुंबात करुन दिले आहेत. त्यामुळे जगताप कुटुंबात वाद आहेत, कुटुंब वेगळं आहे, असा विचारही विरोधकांनी करु नये. ही त्यांना आग्रहाती विनंती असल्याचे अश्विनी जगताप म्हणाल्या.