
Chinchwad By Poll: दरवेळी साहेबांना मतदान, यावेळी स्वतःला...अश्विनी जगताप भावूक
कसबापेठ आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठीच्या मतदानाला सुरुवात झाली आहे. मतदारांनी सकाळी सकाळीच मतदार केंद्रावर हजेरी लावून मतदानात भाग घेण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, चिंचवड मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार अश्विनी जगताप यांनी माध्यमांशी संवाद साधला.
भाजपच्या उमेदवार अश्विनी जगताप यांनी आपला मतदानचा हक्क बजावला. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. मी नेहमी साहेबांना मतदान करायचे, आज मी स्वत:ला मतदान केले. त्यावेळी मनाला थोडसं वेगळं वाटलं. दरवेळी साहेब असायचे, मी त्यांना मतदान करायचे, पण आज स्वत:ला मत देतेय, या भावनेने मनाला हुरहुर वाटली, अशी भावूक भावना अश्विनी जगताप यांनी व्यक्त केली.
यावेळी अश्विनी जगताप यांनी चिंचवडमधील मतदारांना मतदानासाठी घराबाहेर पडण्याचे आवाहनही केले. मतदान हा तुमचा सार्वभौम हक्क आहे, ते तुम्ही बजावला पाहिजे, असे अश्विनी जगताप यांनी म्हटले.
तसेच चिंचवड पोटनिवडणुकीत भाजपकडून सहानुभूतीच्या मुद्द्यावर प्रचार करण्यात आल्याची टीकाही अश्विनी जगताप यांनी फेटाळून लावली. मी या पोटनिवडणुकीत विकासाचा मुद्दाही उचलून धरला होता. पण लक्ष्मण जगताप यांना मानणारा मोठा वर्ग आहे. त्यामुळे थोडाफार सहानुभूतीचा फॅक्टर असणारच, असे अश्विनी जगताप यांनी म्हटले.