चित्रा वाघ व त्यांच्या साथीदारांनीच मला, कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी दिली, पिडीतेचा गौप्यस्फोट

शिवसेनेचे नेते व राज्यमंत्रीपदाचा दर्जा असणारे रघुनाथ कुचिक यांनी बलात्कार करुन गर्भपात करण्यास भाग पाडल्याप्रकरणी पिडीत तरुणीने शिवाजीनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती.
Chitra Wagh
Chitra Waghsakal
Summary

शिवसेनेचे नेते व राज्यमंत्रीपदाचा दर्जा असणारे रघुनाथ कुचिक यांनी बलात्कार करुन गर्भपात करण्यास भाग पाडल्याप्रकरणी पिडीत तरुणीने शिवाजीनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती.

पुणे - शिवसेनेचे नेते रघुनाथ कुचिक (Raghunath Kuchik) यांच्यावर जोरदार हल्ला चढविणाऱ्या भाजपच्या महिला प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ (Chitra Wagh) व त्यांच्या साथीदारांनीच आपल्याला जीवे मारण्याची धमकी (Warning) देऊन कुचिक यांच्याविरुद्ध गुन्हा (Crime) दाखल करण्यास भाग पाडले, असा गौप्यस्फोट रघुनाथ कुचिक प्रकरणातील पिडीत तरुणीने मंगळवारी केला. इतकेच नव्हे, तर आजपर्यंत सगळे जबाब वाघ यांच्या सांगण्यावरुनच दिल्याचेही तिने नमूद केले आहे. हा गौप्यस्फोट चित्रा वाघ यांच्या चांगलाच अंगलट येण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. दरम्यान, पिडीतेच्या गौप्यस्फोटानंतर पुणे पोलिसही "ऍक्‍शन मोड'वर आले असून पिडीतेला कायदेशीर सहकार्य करणार असल्याची भुमिका पुणे पोलिसांनी घेतली आहे.

शिवसेनेचे नेते व राज्यमंत्रीपदाचा दर्जा असणारे रघुनाथ कुचिक यांनी बलात्कार करुन गर्भपात करण्यास भाग पाडल्याप्रकरणी पिडीत तरुणीने शिवाजीनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यावरुन कुचिक यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. दरम्यान, या प्रकरणानंतर चित्रा वाघ यांनी कुचिक यांच्यावर थेट निशाणा साधत त्यांच्याविरुद्ध रान पेटविले होते. पिडीत तरुणीच्या जीवाला धोका असल्यापासून ते ती आत्महत्या करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे तसेच तिचे अपहरण झाल्याचेही सांगण्यात आले. दरम्यान, पिडीत तरुणीने शिवाजीनगर पोलिसांकडे जाऊन हा सर्व प्रकार कथन केला होता. कुचिक यांना या प्रकरणामध्ये जामीन मिळाल्यावरही वाघ यांनी आक्षेप नोंदविला होता. त्यासाठी वाघ यांनी पुण्यातील भाजप कार्यालयामध्ये दोनदा पत्रकार परिषद घेऊन कुचिक यांच्यावर आरोप केले होते. त्याचबरोबर कुचिक व संबंधीत तरुणीमध्ये झालेले मोबाईल चॅट पुढे आणून कुचिक यांच्यासह पुणे पोलिस व महाविकास आघाडीवर गंभीर आरोप केले होते.

'ते' पत्र नेमके कोणाचे ?

दरम्यान, पिडीत तरुणीने मंगळवारी सकाळी "साम टिव्ही'ला मुलाखत देत तिच्याबाबत आत्तापर्यंत घडलेला घटनांना चित्रा वाघ व त्यांचे सहकारीच कसे जबाबदार आहेत, याचा पाढा वाचला.

पिडीत तरुणी म्हणाली, 'मी सोमवारी सकाळी साडे नऊ वाजता शिवाजीनगर पोलिसांनी चौकशीसाठी बोलाविल्याने त्यांच्याकडे चौकशीकामी जात होते. मी उरुळी कांचन इथे आले, त्यावेळी पवार नावाच्या व्यक्तीने एक पत्र माझ्या हातात दिले. त्याने ते पत्र मला कुचिक यांनी दिल्याचे पोलिसांना सांग असे सांगितले. त्या पत्रामध्ये मी हे प्रकरण मागे न ऐकल्यास ते मला जीवे मारुन टाकतील' असा उल्लेख कुचिक यांच्या नावाने केल्याचे दिसले. प्रत्यक्षात कुचिक यांनी असे पत्र पाठविले नाही आणि मला धमक्‍याही दिल्या नाहीत.'

चित्रा वाघ यांनी मला कुटुंबाला जिवे मारण्याची दिली धमकी

पिडीत तरुणी वाघ यांच्याबाबत म्हणाली, 'मागील काही दिवसांपासून चित्रा वाघ यांनी पत्रकार परिषदेत कुचिक व माझे काही चॅट पुढे आणले. प्रत्यक्षात त्यांनी सादर केलेले चॅट मी किंवा कुचिक यांनी मला कधीही पाठविले नव्हते. असे चॅट त्यांनी कुठून आणले, हे मला कळले नाही. मुंबईतील एक व्यक्ती मला वडीलांसारखे होती. मी गरोदर असल्याचे त्या व्यक्तीला कळले. तेव्हा ते मला भेटायला आले. त्यानंतर त्यांनी माझा उपयोग करुन कुचिकांकडे विविध मागण्या करण्यास सुरुवात केली. ते कुचिक यांच्याशी सुडटबुद्धीने वागुन माझा वापर करीत होते. त्यांनी कुचिकांवर जबरदस्तीने गुन्हा दाखल करण्यासाठी माझ्यावर दबाव टाकला. मोहम्मद अहमद, रोहित भिसे व चित्रा वाघ या तिघांनी मिळून गुन्हा दाखल करण्यास भाग पाडले.'

काय घडले गोव्यात ?

कथित अपहरणाच्या प्रकरणाबाबत पिडीत तरुणी म्हणाली, 'वाघ याच मला पोलिसांना जबाब देण्यास सांगत होत्या. गोव्याच्या प्रकरणात अपहरणापर्यंत, मला मान्य नसलेल्या गोष्टी त्यांनी करायला लावल्या, कुचिक हे करु न शकणाऱ्या गोष्टीसी त्यांनीच केल्याचे सांगण्यास भाग पाडले. हे चुकिचे घडत होते. वाघ या मला कुचिक कसे वाईट आहेत, तु जर कुचिकांविरुद्ध तक्रार केली नाही, तर तुला, कुटुंबीयांना मारुन टाकू, अशी धमकी देत होत्या. गोव्यात वाघ यांचा कार्यकर्ता दिपक पवार नावाचा व्यक्ती व त्याचे साथीदार आहेत. त्यांनीच मला तीन ते चार दिवस इंजेक्‍शन देऊन जबरदस्तीने ठेवले होते. त्यानंतर वाघ याच मला 'मी काय बोलायचे, काय बोलायचे नाही,' हे सतत सांगत होत्या. मी प्रत्यक्षात चित्रा वाघ यांच्याकडे गेले नव्हते. मोहम्मद व रोहित भिसे यांनी वाघ यांना माझी सगळी माहिती दिली होती. आजही माझ्या मोबाईवर येणाऱ्या-जाणाऱ्या फोनवर चित्रा वाघ यांचे लक्ष आहे. चित्रा वाघ यांनी यापुर्वीही मला जीवे मारण्याची धमकी दिली आहे.''

'आम्ही आत्तापर्यंत हे प्रकरण अतिशय संवेदनशीलपणे हाताळले आहे. मंगळवारी सकाळी पिडीत तरुणीने प्रसारमाध्यमांसमोर येऊन काही माहिती दिली. परंतु अजूनही पिडीत तरुणी पोलिसांकडे आली नाही. ती जर पोलिसांकडे आली, तर तिला कायदेशीर सहकार्य केले जाईल.'

- डॉ. प्रियांका नारनवरे, पोलिस उपायुक्त, परिमंडळ एक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com