चिक्कीचे बिल न देणारा व्यावसायिक गोत्यात

सुधीर साबळे 
शुक्रवार, 24 ऑगस्ट 2018

पिंपरी - शहरातील एक व्यावसायिक काही कामानिमित्त गाडीने मुंबईला निघाले होते. लोणावळ्यामध्ये त्यांनी चार हजार रुपयांच्या चिक्‍कीची खरेदी केली. त्यांनी याबाबत दुकानदाराकडे बिलाची मागणी केली. तुम्हाला बिल कशाला हवे आहे, असे म्हणत ते देण्याचे टाळले. मग काय, संतापलेल्या या व्यावसायिकाने आपली तक्रार थेट पंतप्रधान कार्यालयाकडे केल्यानंतर तपासाची चक्रे वेगात फिरली. याप्रकरणी केंद्रीय वस्तू आणि सेवा कर विभागाला (जीएसटी) याची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 

चिक्‍कीवर आकारण्यात येणाऱ्या जीएसटीची रक्‍कम व्यावसायिक भरतो की नाही, याची माहिती करून घेण्यासाठी बिलाची मागणी करण्यात आली होती. पंतप्रधान कार्यालयाकडे यासंदर्भात तक्रार केल्यानंतर ती केंद्रीय वित्त मंत्रालयाकडून केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाकडे पाठवण्यात आली. त्यांनी या तक्रारीची दखल घेऊन ती केंद्रीय जीएसटी मुख्यालयाकडे पाठवली. या प्रकाराची सविस्तर तपासणी करण्याचे आदेश देत हे प्रकरण आता पुण्यातील कार्यालयाकडे पाठवण्यात आले आहे. सध्या या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू करण्यात आली आहे. व्यावसायिकांनी जीएसटी विभागाकडे नोंदणी केली आहे का, नियमितपणे रिटर्न भरत आहेत का, याची तपासणी सुरू केली असून लवकरच ती पूर्ण होणार आहे. त्यामध्ये तो दोषी आढळल्यास त्याच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. या प्रकरणाचा सविस्तर अहवाल दिल्लीतल्या मुख्यालयाकडे पाठवण्यात येणार असल्याचे जीएसटी विभागातील सूत्रांनी ‘सकाळ’ला सांगितले. 

तक्रारींचे प्रमाण वाढले
अनेक व्यावसायिक ग्राहकांना बिल देत नसल्याच्या तक्रारींचे प्रमाण वाढले आहे. केंद्रीय जीएसटी विभागाकडे येणाऱ्या तक्रारीची दखल घेण्यात येत आहे. प्रत्येक तक्रारीची शहानिशा करून त्याची माहिती जमा करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. काही जणांनी जीएसटी विभागाकडे नोंदणी केली नसल्याची माहिती मिळाली आहे. या अनुषंगाने लवकरच सर्वेक्षणाचे काम हाती घेणार असल्याचे या विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

Web Title: chkki bill issue in lonavala