'कॉमर्स'कडे वाढतोय विद्यार्थ्यांचा कल

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 13 जुलै 2019

पुणे - अकरावी प्रवेशाच्या पहिल्या फेरीत 48 हजार 701 विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी कनिष्ठ महाविद्यालय देण्यात आले आहे. या फेरीत विद्यार्थ्यांनी सर्वाधिक पसंती वाणिज्य शाखेला दिली. मराठी आणि इंग्रजी माध्यम मिळून या शाखेला 21 हजार 683 विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला आहे. 

पुणे - अकरावी प्रवेशाच्या पहिल्या फेरीत 48 हजार 701 विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी कनिष्ठ महाविद्यालय देण्यात आले आहे. या फेरीत विद्यार्थ्यांनी सर्वाधिक पसंती वाणिज्य शाखेला दिली. मराठी आणि इंग्रजी माध्यम मिळून या शाखेला 21 हजार 683 विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला आहे. 

पहिल्या फेरीची गुणवत्ता यादी केंद्रीय प्रवेश प्रक्रिया समितीने शुक्रवारी जाहीर केली. त्यानुसार मिळालेल्या महाविद्यालयात 13 आणि 15 जुलै रोजी सकाळी अकरा ते सायंकाळी पाच या वेळेत, तर 16 जुलै रोजी सकाळी अकरा ते दुपारी तीन या वेळेत विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्‍चित करणे बंधनकारक आहे. ज्यांना पहिल्या पसंतीचे महाविद्यालय मिळाले आहे, त्या विद्यार्थ्यांनी मिळालेल्या कनिष्ठ महाविद्यालयात जाऊन प्रवेश घेणे बंधनकारक आहे. जे विद्यार्थी प्रवेश घेणार नाहीत, त्यांची नावे पुढील नियमित फेऱ्यांसाठी प्रतिबंधित (ब्लॉक) केली जाणार आहेत. 

प्रवेश मान्य नसल्यास 
विद्यार्थ्यांना पसंतीक्रम दोन ते दहा या पैकी कोणतेही महाविद्यालय मिळाले असेल, तर ते प्रवेश घेऊ शकतात. त्यासाठी प्रवेशाच्या संकेतस्थळावर जाऊन स्टुडंट लॉगिनमध्ये "प्रोसिड' या बटणावर क्‍लिक करणे आवश्‍यक आहे. त्यानंतर विद्यार्थी कनिष्ठ महाविद्यालयात जाऊन आवश्‍यक कागदपत्रे देऊन प्रवेश निश्‍चित करावा तसेच त्याची प्रिंट घ्यावी. दोन ते दहा या पसंतीक्रमापैकी एक कनिष्ठ महाविद्यालय मिळूनही तेथे प्रवेश घ्यायचा नसेल, तर अशा विद्यार्थ्यांनी पुढील गुणवत्ता यादीची वाट पाहावी. कोणत्याही कनिष्ठ महाविद्यालयात जाऊन तात्पुरता प्रवेश घेण्याची गरज नाही. 

घेतलेला प्रवेश रद्द केल्यास 
विद्यार्थ्याने पसंतीक्रम दोन ते दहा यापैकी कोणत्याही कनिष्ठ महाविद्यालयात घेतला असल्यास तो रद्द करू नये. रद्द केल्यास विद्यार्थी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतून प्रतिबंधित केले जाणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी विचारपूर्वक निर्णय घेऊन प्रवेश निश्‍चित करावा. या फेरीतील गुणवत्ता यादीनुसार ज्यांना प्रवेश घ्यायचे आहेत, त्यांनी प्रवेशावेळी कागदपत्रे विहित मुदतीत सादर करणे आवश्‍यक आहे. 

पहिल्या पसंतीचे 
पहिल्या फेरीच्या गुणवत्ता यादीत 24 हजार 364 जणांना प्रवेशासाठी पहिल्या पसंतीचे कनिष्ठ महाविद्यालय मिळाले आहे. या विद्यार्थ्यांनी मिळालेल्या महाविद्यालयात प्रवेश घेणे बंधनकारक आहे. त्यासाठी त्यांनी प्रवेशाच्या संकेतस्थळावर स्टुडंट लॉगिनमध्ये जाऊन "प्रोसिड' या बटणावर क्‍लिक करावे. त्यानंतर महाविद्यालयात जाऊन प्रवेश निश्‍चित करायचा आहे. 

प्रवेश न मिळाल्यास 
पहिल्या गुणवत्ता यादीत ज्या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी महाविद्यालय मिळालेले नाही, त्यांना पुढील फेरी गुणवत्ता आणि वैधानिक आरक्षणानुसार प्रवेश मिळतील. अशा विद्यार्थ्यांनी पुढील फेरीची वाट पाहायची आहे. 

पहिल्या फेरीसाठी प्राप्त अर्ज : 63,566 
प्रवेश मिळालेले विद्यार्थी : 48,701 
प्रथम पसंतीक्रम मिळालेले विद्यार्थी : 24,364 
प्रवेश न मिळालेले विद्यार्थी : 14,865 
----------- 
शाखानिहाय प्रवेश 
शाखा माध्यम प्रवेश 

कला मराठी 3,522 
कला इंग्रजी 1,759 
वाणिज्य मराठी 7,042 
वाणिज्य इंग्रजी 14,641 
विज्ञान इंग्रजी 20,561 
एमसीव्हीसी -- 1.176 

---------------- 
एकूण -- 48701 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Choice in the first round of Commerce branch