नाताळनिमित्त सजले चर्च

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 24 डिसेंबर 2018

पिंपरी - नाताळनिमित्त शहरातील सर्वच चर्चमध्ये सजावटीची लगबग सुरू आहे. चर्चमध्ये गाईची गव्हाण उभारणे, तारा उभारणे, आकर्षक विद्युत रोषणाई आदी कामांमध्ये ख्रिस्ती बांधव व्यग्र होते.

पिंपरी - नाताळनिमित्त शहरातील सर्वच चर्चमध्ये सजावटीची लगबग सुरू आहे. चर्चमध्ये गाईची गव्हाण उभारणे, तारा उभारणे, आकर्षक विद्युत रोषणाई आदी कामांमध्ये ख्रिस्ती बांधव व्यग्र होते.

पिंपरीतील चर्चसह चिंचवडमधील सेंट फ्रान्सिस झेवियर्स चर्च, निगडीतील बाळ येशू चर्च, दापोडीतील होलीक्रॉस चर्च, देहूतील संत ज्यूड, सांगवीतील होली त्रैत्य आदी चर्चमध्ये रंगरंगोटी, सजावटीची कामे सुरू होती. ख्रिश्‍चन धर्मीयांमध्ये येशू ख्रिस्त यांचा जन्म हा जगाला प्रकाश देणारा समजला जातो. त्याचे प्रतीक म्हणून जाड कागदापासून बनविलेला तारा चर्चमध्ये लावण्यात येतो. त्याचप्रमाणे येशू यांचा जन्म गायीच्या गव्हाणीत झाला होता. त्यामुळे चर्चमध्ये गाईची गव्हाणही उभारली होती. 

सजावट साहित्य खरेदीसाठी गर्दी
नाताळनिमित्त ख्रिस्ती बांधव घरोघरी आकर्षक सजावट करतात. सजावटीसाठी शहरातील बाजारपेठांमध्ये ख्रिसमस ट्री, बेल, सांताक्‍लॉजच्या मूर्ती, सांताक्‍लॉजचे चित्र असलेले आकर्षक आकाशकंदील आदी साहित्याची रेलचेल होती. माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील अनेक कंपन्यांना शनिवार, रविवार जोडून सुटी असते. त्यातच चौथा शनिवार असल्याने सरकारी कार्यालयांनाही सुटी होती. पर्यायाने, सजावट खरेदीसाठी गर्दी झाली होती. पिंपरी बाजारपेठेत ‘ख्रिसमस ट्री’ ही ५० रुपयांपासून एक हजारापर्यंत उपलब्ध होते. हिरव्या प्लॅस्टिकच्या बारिक तुकड्यांपासून बनविलेले आकर्षक ‘ख्रिसमस ट्री’ही विक्रीसाठी होते. बेल तीस रुपयांपासून तीनशे रुपयांपर्यंत होते. टोपी दहा रुपयांपर्यंत उपलब्ध होती. पुणे-मुंबई महामार्गाच्या कडेने राजस्थानमधून आलेले विक्रेते सांताक्‍लॉजचे चित्र असलेल्या ख्रिसमससाठीच्या टोप्या विकत आहेत. त्याची किंमत चाळीस रुपयांना एक आहे. सांताक्‍लॉजच्या मूर्तीही बाजारात आल्या आहेत. त्याची किंमत तीन ते पाच हजार रुपयांच्या दरम्यान आहे. सांताक्‍लॉजचे चित्र असलेल्या कागदी आकाशकंदीलाची किंमत पन्नास ते तीनशे रुपयांच्या दरम्यान आहे. ‘क्रॉस’ दोनशे ते अडिचशे रुपयांपर्यंत उपलब्ध आहे. त्याशिवाय घराच्या सजावटीसाठी झुरमुळ्या, विविध पद्धतीचे दिवे, फुलांच्या माळा, विजेच्या दिव्यांच्या माळा यांनाही ग्राहकांकडून मागणी आहे.

नाताळनिमित्त वस्तूंच्या किमती स्थिर आहेत. शहराच्या विविध भागांतून तसेच परिसरातील लहान गावांमधून ख्रिस्ती बांधव खरेदीसाठी येत आहेत. त्यांच्यामध्ये उत्साह पाहण्यास मिळत आहे.
- उमेश सतेजा, विक्रेते

Web Title: Christmas Celebration Church Decoration