पवना, कासारसाईतून विसर्ग; नागरिकांना दक्षतेचा इशारा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 22 ऑगस्ट 2018

पिंपरी - शहर परिसर आणि मावळात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे पवना आणि कासारसाई धरणे शंभर टक्के भरली आहेत. दोन्ही धरणांमधून पाण्याचा दररोज विसर्ग सुरू आहे. त्यामुळे पवना नदीला पूर आला असून, नदीकाठच्या वस्त्यांमधील नागरिकांनी सतर्क राहावे. तसेच, आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवावी, अशा सूचना अतिरिक्त आयुक्त दिलीप गावडे यांनी अधिकारी, कर्मचाऱ्यांना मंगळवारी (ता.२१) केल्या. 

पिंपरी - शहर परिसर आणि मावळात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे पवना आणि कासारसाई धरणे शंभर टक्के भरली आहेत. दोन्ही धरणांमधून पाण्याचा दररोज विसर्ग सुरू आहे. त्यामुळे पवना नदीला पूर आला असून, नदीकाठच्या वस्त्यांमधील नागरिकांनी सतर्क राहावे. तसेच, आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवावी, अशा सूचना अतिरिक्त आयुक्त दिलीप गावडे यांनी अधिकारी, कर्मचाऱ्यांना मंगळवारी (ता.२१) केल्या. 

महापालिकेने मुख्य प्रशासकीय इमारतीत मध्यवर्ती आणि क्षेत्रीय कार्यालय स्तरावर पूरनियंत्रण कक्ष स्थापन केले आहेत. त्याचे अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या बैठकीत अतिरिक्त आयुक्त गावडे बोलत होते. शहर अभियंता अंबादास चव्हाण, सहशहर अभियंता अय्युबखान पठाण, प्रशासन अधिकारी ज्योत्स्ना शिंदे, आपत्ती व्यवस्थापन सहाय्यक आयुक्त आशादेवी दुरगुडे, सहाय्यक आयुक्त संदीप खोत, अण्णा बोदडे, आशा राऊत, विजय खोराटे, श्रीनिवास दांगट, मनोज लोणकर, मंगेश चितळे, मुख्य अग्निशमन अधिकारी किरण गावडे, सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, वायरलेस इन्चार्ज थॉमस नरोना, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ओमप्रकाश बहिवाल आणि कार्यकारी अभियंता उपस्थित होते. आपत्कालीन परिस्थिती उद्‌भवल्यास नागरिकांनी पूर नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा, असे आवाहन गावडे यांनी केले आहे.

नागरिकांना आवाहन
पूरस्थितीत नागरिकांनी एकमेकांना मदत करून प्रशासनास सहकार्य करावे, नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहून पर्यायी ठिकाणी अथवा संक्रमण शिबिरात स्थलांतरित व्हावे, जीवित व वित्त हानी टाळावी, ओले रस्ते व वळणांवर वाहन नियंत्रित वेगाने व सावकाश चालवावे. पावसापासून बचाव करण्यासाठी झाडे, पडक्‍या इमारती, भिंती, जाहिरात फलक, मोबाईल टॉवर यांच्या जवळपास थांबू नये. घरातील वीजवाहक तारा व विद्युत उपकरणांची तज्ज्ञांकडून तपासणी करून घ्यावी. रस्त्यावरील वीजवाहक तारा, विजेचे खांब, डीपी बॉक्‍स, फीडरच्या संपर्कात येऊ नये. अशा ठिकाणी जनावरे जाऊ देऊ नये किंवा बांधू नये. रस्त्यात साचलेले पाणी, नाले व पुलावरून पाणी वाहत असताना जाऊ नये. पुराच्या पाण्यात पोहू नये. पूरस्थिती अथवा दरड कोसळण्याची शक्‍यता असलेल्या ठिकाणी वास्तव्य करू नये. औद्योगिक क्षेत्रात उघड्यावर रासायनिक पदार्थांचा साठा करू नये. 

हेल्पलाइन
मध्यवर्ती पूर नियंत्रण कक्ष - 
०२०-६७३३१५५६, ३९३३१४५६
मुख्य अग्निशमन केंद्र - १०१, ०२०-२७४२३३३३, २७४२२४०५, ९९२२५०१४७५
अ क्षेत्रीय कार्यालय - ०२०-२७६५६६२१, २७६४१६२७, ९९२२५०१४५३, ९९२२५०१४५४
ब क्षेत्रीय कार्यालय - ९९२२५०१४५५, ९९२२५०१४५६
क क्षेत्रीय कार्यालय - ०२०-२७१२२९६९, ९९२२५०१४५७, ९९२२५०१४५८
ड क्षेत्रीय कार्यालय - ०२०-२७२७७९८, ९९२२५०१४५९, ९९२२५०१४६०
ई क्षेत्रीय कार्यालय - ०२०-२७२३०४१०, २७२३०४१२, ८६०५७२२७७७
फ क्षेत्रीय कार्यालय - ०२०-२७६५०३२४, ८६०५४२२८८८
ग क्षेत्रीय कार्यालय - ७७८७८६८५५५, ७८८७८७९५५५
ह क्षेत्रीय कार्यालय - ०२०-२७१४२५०३, ९१३००५१६६६, ९१३००५०६६६

Web Title: Citizens alert water release in Pawana dam