डोर्लेवाडीत जनता कर्फ्यूचे तीनतेरा...

सोमनाथ भिले
Friday, 11 September 2020

बारामती तालुक्यात कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेऊन जनता कर्फ्यू लागू केला आहे. मात्र, डोर्लेवाडी (ता. बारामती) येथे नागरिक मोकाटपणे विनामास्क फिरत आहेत. किराणा, फळभाजी विक्रेते व इतर व्यावसायिक दुकाने उघडून माल देत आहेत.

डोर्लेवाडी (पुणे) : बारामती तालुक्यात कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेऊन जनता कर्फ्यू लागू केला आहे. मात्र, डोर्लेवाडी (ता. बारामती) येथे नागरिक मोकाटपणे विनामास्क फिरत आहेत. किराणा, फळभाजी विक्रेते व इतर व्यावसायिक दुकाने उघडून माल देत आहेत. नागरिकांवर स्थानिक प्रशासनाचा कोणताही अंकुश राहिलेला नाही. त्यामुळे जनता कर्फ्यूचा पुरता बोजवारा उडाल्याचे चित्र आहे. 

पुणेकरांनी काळजी घेण्याचे महापालिकेचे आवाहन; रोजच्या तपासणीत 28 टक्के कोरोनाबाधित

बारामती शहर व तालुक्यातील कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येची प्रशासनाने गंभीर दखल घेत सोमवारपासून (ता.7) जनता कर्फ्यू लागू केला आहे. बारामती शहरात त्याची कडक अंमलबजावणी सुरू आहे. विनामास्क व नियमांचे पालन न करणाऱ्या शेकडो नागरिकांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. मात्र, त्या तुलनेत ग्रामीण भागातील चित्र पूर्णपणे वेगळे आहे. डोर्लेवाडी येथे जनता कर्फ्यू असूनही नागरिक मोकाटपणे विनामास्क रस्त्यांवर आढळून येत आहेत. चौकाचौकात गर्दी करून बसत आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

बँक, मेडिकलमध्ये गर्दी करीत आहेत. अनेक किराणा दुकानदार, भाजी विक्रेते व इतर व्यावसायिक सर्रास चोरून मालाची विक्री करीत आहेत. ग्रामपंचायतीचे सरपंच, पोलिस पाटील, तंटामुक्त अध्यक्ष, कोतवाल हे घरी जाऊन सूचना करूनही व्यावसायिक त्यास जुमानत नाहीत. त्यामुळे स्थानिक प्रशासनाचा कोणताही धाक राहिला नसल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र, गावात या आठवड्यात तब्बल 19 रुग्ण सापडले. त्यामुळे गावात सर्वसामान्य नागरिकांच्या मनात भीतीचे वातावरण आहे. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

दरम्यान, बारामतीच्या पूर्व पट्ट्यातील मळद, गुणवडी, पिंपळी, झारगडवाडी, सोनगाव, मेखळी या गावातही कोरोनाबाधित रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. अशा परिस्थितीत स्थानिक प्रशासनाने कठोर भूमिका घेऊन व वेळप्रसंगी पोलिस प्रशासनाची मदत घेऊन जनता कर्फ्यूची कडक अंमलबजावणी करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Citizens in Dorlewadi do not properly follow with the janta curfew