दाखल्यांसाठी नागरिकांची झुंबड

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 12 मे 2017

‘पंतप्रधान आवास’साठी तलाठी कार्यालयातील स्थिती

पिंपरी - पंतप्रधान आवास योजनेतील अर्जामध्ये रहिवासी व उत्पन्नाचा दाखल्याची मागणी केली आहे. यामुळे तलाठी कार्यालयात दाखले मिळविण्यासाठी नागरिकांची एकच झुंबड उडाली आहे.

‘पंतप्रधान आवास’साठी तलाठी कार्यालयातील स्थिती

पिंपरी - पंतप्रधान आवास योजनेतील अर्जामध्ये रहिवासी व उत्पन्नाचा दाखल्याची मागणी केली आहे. यामुळे तलाठी कार्यालयात दाखले मिळविण्यासाठी नागरिकांची एकच झुंबड उडाली आहे.

पंतप्रधान आवास योजनेतून ‘सर्वांसाठी घर’ हा प्रकल्प पिंपरी चिंचवड महापालिका चऱ्होली येथे राबविणार आहे. या योजनेकरिता किती लाभार्थी आहेत, याची आकडेवारी निश्‍चित करण्यासाठी महापालिकेने नागरिकांकडून अर्ज मागविले आहेत. या अर्जामध्ये रहिवासी व उत्पन्नाचा दाखलाही मागितला आहे. अर्ज भरण्यासाठी अखेरची तारीख १६ मे देण्यात आली आहे. यामुळे अखेरच्या टप्प्यात हे दाखले मिळविण्यासाठी तलाठी कार्यालयात नागरिकांची गर्दी झाली आहे.

तलाठ्यांकडे अतिरिक्‍त कार्यभार
सध्या शहरातील तलाठ्यांची संख्या कमी आहे. पिंपरीतील एका भ्रष्ट तलाठ्याला लाच घेताना पकडल्यानंतर त्यांचा अतिरिक्‍त कार्यभार रहाटणी येथील तलाठी अर्चना रोकडे यांच्याकडे दिला आहे. पिंपरी तलाठी कार्यालयाच्या अंतर्गत लाल टोपीनगर, गांधीनगर, संजय गांधीनगर आदी परिसरासह मध्यमवर्गीयांचा भाग येतो. यामुळे पंतप्रधान आवास योजनेतील अर्ज भरणाऱ्यांची संख्या या भागातून जास्त आहे. पिंपरीतील डीलक्‍स टॉकीजजवळील तलाठी कार्यालयात फलक लावून रहाटणी येथील तलाठी कार्यालयात संपर्क करण्याचे आवाहन केले आहे, तर रहाटणी येथील तलाठी कार्यालयाच्या अंतर्गत नवी सांगवी, पिंपळे गुरव, पिंपळे सौदागर, रहाटणी आणि काळेवाडी हे भाग येतात. यामुळे रहाटणी येथील कार्यालयात नागरिकांची एकच गर्दी झाली आहे. अशीच स्थिती चिंचवड येथील तलाठी कार्यालयात आहे. 

चिंचवड, आकुर्डी आणि देहूरोड येथील तीनही तलाठी कार्यालयाचा पदभार आरती खरे यांच्याकडे आहे.

नागरिकांचा गोंधळ
चिंचवड आणि रहाटणी येथील तलाठी कार्यालयातून सध्या दररोज पाचशे रहिवासी व उत्पन्नाचे दाखले दिले जात आहेत. पंतप्रधान आवास योजनेकरिता या दाखल्यांची आवश्‍यकता नसल्याचे तलाठ्यांनी सांगितल्यानंतरही आम्ही दाखल्याची मागणी करीत आहोत आणि तुम्हाला तो द्यावाच लागेल, अशी भाषा नागरिकांकडून केली जाते.

झेरॉक्‍स दुकानदाराकडूनही गैरफायदा
रहाटणी येथील तलाठी कार्यालयाजवळ असलेल्या एका झेरॉक्‍स दुकानदारही गैरफायदा घेत असल्याचे दिसून आले. स्वघोषित उत्पन्न अर्जाच्या झेरॉक्‍सकरिता तो पाच रुपये आणि अर्जाची झेरॉक्‍स काढण्यासाठी प्रत्येकी तीन रुपये घेत नफेखोरी करीत असल्याचे दिसून आले.

 तलाठी कार्यालयातच एजंट
सकाळच्या प्रतिनिधीने चिंचवड येथील तलाठी कार्यालयात पाहणी केली असता एक एजंट तलाठी कार्यालयातील खुर्चीत बसून नागरिकांकडून ५० रुपये घेऊन अर्ज भरून देत असल्याचे दिसून आले. ही बाब तलाठी आरती खरे यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी त्या एजंटला कार्यालयाबाहेर हाकलून दिले. तसेच कार्यालयाच्या १०० मीटर परिसरात दिसल्यास कारवाई करण्याचा दमही दिला. त्यानंतर त्या एजंटाने तलाठी कार्यालयासमोर पार्क केलेल्या रिक्षाचा आधार घेतला.

अर्जाची रस्त्यावर ३० रुपयांना विक्री
पंतप्रधान आवास योजनेच्या अर्जाची कुठेही अधिकृत विक्री केली जात नाही. मात्र, चिंचवड येथील झोपडपट्टी निर्मूलन व पुनर्वसन (झोनिपु) कार्यालयाबाहेर पाच रुपयांच्या एका फोल्डरसह अर्जाची तीस रुपयांना विक्री होत आहे.

पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत पिंपरी- चिंचवड महापालिकेकडून ‘सर्वांसाठी घर’ हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. या प्रकल्पातील लाभार्थ्यांची संख्या निश्‍चित करण्यासाठी महापालिकेने नागरिकांना अर्ज भरून देण्याचे आवाहन केले आहे. महापालिकेच्या संकेतस्थळावर हे अर्ज डाउनलोड करून त्यांची प्रिंट काढू शकतात. तसेच, त्या अर्जांची झेरॉक्‍सही ग्राह्य धरली जाणार आहे. मात्र, अशिक्षित नागरिकांच्या अज्ञानाचा गैरफायदा घेण्याचे काम सध्या ठिकठिकाणी सुरू आहे. चिंचवडगाव येथील झोनिपू कार्यालयाबाहेर या अर्जाची तीस रुपयांना विक्री होत असल्याचे दिसून आले. 

एक व्यक्‍ती पंतप्रधान आवास योजना नाव लिहिलेली पाच रुपयांची फाइल व अर्जाची झेरॉक्‍स असे नागरिकांना देत असून, त्यांच्याकडून ३० रुपये उकळत आहे.

अनेक सायबरमध्येही संकेतस्थळावरून अर्ज डाउनलोड करण्यासाठी, तसेच त्यांची प्रिंट काढण्यासाठी प्रत्येकी १०० रुपये घेत आहेत. मात्र अर्जांची प्रिंट न काढता फक्‍त झेरॉक्‍स दिली जात आहे. महापालिकेच्या कार्यालयाबाहेर काही एजंटांनी ठाण मांडले आहे. अर्ज व कागदपत्रे तपासून देण्यासाठी पन्नास रुपये आणि अर्ज भरून देण्यासाठी १०० रुपये घेतले जात असल्याचेही दिसून आले आहे.

अधिकाऱ्याने हात झटकले
याबाबत बोलताना सहायक आयुक्‍त योगेश कडुसकर म्हणाले, ‘‘घरकुलाच्या अर्जांची विक्री महापालिकेच्यावतीने केली जात नाही. या अर्जाची झेरॉक्‍सही ग्राह्य धरली जाणार आहे. महापालिका कार्यालयाबाहेर कोण किती रुपयांना अर्जविक्री करतो, त्याचा महापालिकेशी संबंध नाही. यामुळे अशा व्यक्‍तींवर कोणत्याही प्रकारची कारवाई महापालिका करणार नाही.’’

पंतप्रधान आवास योजनेकरिता अर्ज भरताना आधार कार्ड, पॅन कार्ड, उत्पन्नाबाबत स्व-घोषणापत्र, रहिवासी पुरावा (उदा. मतदान कार्ड, शिधापत्रिका, आधार कार्ड, कोणताही शासकीय रहिवासी पुरावा), बॅंक तपशील (पासबुकच्या पहिल्या पानाची झेरॉक्‍स. बॅंकेत केलेल्या व्यवहाराच्या स्टेटमेंटची आवश्‍यकता नाही.). अर्जासोबत तलाठी कार्यालयातील रहिवासी दाखला व उत्पन्नाच्या दाखल्याची आवश्‍यकता नाही.
- योगेश कडुसकर, सहायक आयुक्‍त

Web Title: citizens mob for income certificate