हडपसर गावठाणातील नागरिक अशुध्द पाण्याने हैराण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

हडपसर गावठाणातील नागरिक अशुध्द पाण्याने हैराण

हडपसर येथील गावठाणात गेली अनेक महिन्यांपासून अशुद्ध पिवळसर दुर्गंधीयुक्त पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होत आहे.

हडपसर गावठाणातील नागरिक अशुध्द पाण्याने हैराण

हडपसर - येथील गावठाणात गेली अनेक महिन्यांपासून अशुद्ध पिवळसर दुर्गंधीयुक्त पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होत आहे. यामुळे येथील नागरिकांना वारंवार पोटाच्या विकारांशी सामना करावा लागत आहे. पाणीपुरवठा विभाग व सहाय्यक आयुक्त कार्यालयाकडे अनेकदा तक्रार करूनही त्याकडे दुर्लक्ष होत असल्याची तक्रार रहिवाशांनी केली आहे.

येथील ससाणे आळी, रामोशी आळी, शिंपी आळी, आझाद आळी, डांगमाळघ विहार आळी, मगर आळी आदी भागातील वितरिका जुन्या होऊन गंजलेल्या आहेत. काही ठिकाणी त्या कुजून फुटलेल्या आहेत. त्यामुळे त्यामधून पिवळसर व दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठा होत आहे. हे पाणी गाळून घेऊनही नागरिकांना विशेषतः लहान मुले व वृध्दांना वारंवार पोटदुखीचे आजार होत आहेत, अशी तक्रार सामाजिक कार्यकर्ते महेंद्र बनकर, स्थानिक नागरिक माणिक खेंगट, बाळासाहेब खेंगट, चंद्रकांत टिळेकर यांनी केली आहे.

सामाजिक कार्यकर्ते बनकर म्हणाले, "येथील वितरिका जुन्या होऊन त्यांना गंज चढला आहे. हा गंज पाण्यात उतरत आहे. काही वितरिकांमध्ये बाहेरील सांडपाणी मिसळत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये पोटाच्या विकारांचे प्रमाण वाढले आहे. या अशुद्ध पाणीपुरवठ्याबाबत हडपसर क्षेत्रीय कार्यालय व पालिकेचा पाणीपुरवठा विभाग यांना तक्रार वारंवार तक्रार केली जात आहे. मात्र, पालिका प्रशासन याबाबत गांभीर्याने घेत नाही.'

'आगोदरच पाणीपुरवठा अपूरा होत आहे. त्यात पुन्हा तो आजूनही दूषित होत असल्याने आमचे आरोग्य धोक्यात आले आहे.'

- दिपाली मते, रामोशी आळी

"आम्ही कर भरूनही अशुध्द पाणीपुरवठा करून महापालिका आमच्या आरोग्याशी खेळत आहे. संबंधीत विभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने उपाययोजना केली पाहिजे.'

- वृशाली जगताप, शिंपी आळी

"गावठाणातील वितरिका, ड्रेनेज लाईन अनेक वर्षे जुन्या आहेत. पालिकेने त्या संपूर्णपणे बदलून नवीन वाहिन्या टाकण्याची आमची मागणी आहे.'

- बाळू ससाणे, ससाणे आळी

"गावठाणातील साठ वर्षांपूर्वीच्या जुन्या वितरिका जीर्ण झालेल्या आहे. पालिकेकडून जलवाहिन्या वेळोवेळी स्वच्छ केल्या जात नाहीत. केल्याच तर त्यासाठी चुकीची व अशास्त्रीय पध्दत वापरली जाते. तेथूनच अनेकदा दूषित पाणी वाहिनीत शिरत असते.'

- ठकसेन सातव, आझाद आळी

'या भागातील वाहिन्या जुन्या झालेल्या आहेत. परिसरात २४ × ७ अंतर्गत त्या बदलण्याचे काम चालू आहे. एकावेळी सर्व काम करणे शक्य नसल्याने टप्प्याटप्प्याने काम करण्यात येत आहे ससाणे आळी, रामोशी आळी येथील काम झाले आहे. आझाद आळीतील काम करण्यात येणार आहे. ड्रेनेज लाईनच्या दुरुस्तीबाबत वॉर्ड ऑफीसला कळविले आहे.'

- पराग सावरकर, अभियंता, लष्कर पाणीपुरवठा

टॅग्स :watervillageHadapsar