#PuneFlood ...आता संसार उभा करायचा कसा? 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 6 ऑगस्ट 2019

राजकीय कार्यकर्ते, संस्था खाण्या-पिण्याची सोय करीत असले, तरी पै-पै जमवून उभा केलेला संसार बुडाल्याने तो पुन्हा उभा कसा करायचा, यामुळे हे नागरिक चिंताग्रस्त आहेत.

पुणे - घरात पाणी घुसून संसार वाहून गेला. पाणी ओसरेपर्यंत महापालिकेच्या शाळेत राहायला मिळत असले, तरी सोबत ना अंथरूण-पांघरूण. लहान मुले, स्त्रिया, वृद्ध थंडीत कुडकुडत दिवस-रात्र काढत आहेत. राजकीय कार्यकर्ते, संस्था खाण्या-पिण्याची सोय करीत असले, तरी पै-पै जमवून उभा केलेला संसार बुडाल्याने तो पुन्हा उभा कसा करायचा, यामुळे हे नागरिक चिंताग्रस्त आहेत. 

धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस पडत असल्याने शहरातून वाहणाऱ्या मुळा-मुठा नदीला पूर आला आहे. नदीकाठच्या वस्त्यांमध्ये पाणी शिरले आहे. अनेक झोपड्यांना जलसमाधी मिळाली आहे. ज्या वस्त्या पाण्याखाली गेल्या आहेत, तेथील नागरिकांची राहण्याची व्यवस्था महापालिकेच्या शाळांमध्ये करण्यात आली आहे. काँग्रेस भवनाच्या पाठीमागे असलेल्या लाल बहादूर शास्त्री विद्यालय, शाळा क्रमांक १४ येथे आसरा घेतलेल्या नागरिकांनी ‘सकाळ’शी संवाद साधला. 

महापालिकेच्या घंटागाडीवर कचरा गोळा करण्याचे काम करणाऱ्या राणी शर्मा म्हणाल्या, ‘‘डेंगळे पुलाजवळील राजीव गांधी वसाहतीत शनिवारी पाणी शिरले. तेव्हापासून येथे मुक्कामाला आले. घरातील भांडे, कपडे, टीव्ही, फ्रीज, सिलिंडर, मुलांच्या वह्या-पुस्तके सगळं पाण्यात वाहून गेले. पुराचे पाणी एवढे आहे, की लांबून आमची झोपडीही दिसत नाही. येथे खाण्या-पिण्याची सोय आहे; पण आमच्या झालेल्या नुकसानाचे काय? थोडं लवकर सतर्क केलं असतं, तर सामान घेऊन बाहेर पडलो असतो.’’ 

अलका गायकवाड म्हणाल्या, ‘‘घरात पाणी घुसल्यावर सोबत काय घ्यावं, याची गडबड सुरू झाली. आधी मुलांना बाहेर काढलं; पण परत घरात जाता आलं नाही. आम्ही अंगावरच्या कपड्यांवरच बाहेर पडलो. महापालिकेच्या शाळेत राहायला असलो, तरी अंथरूण-पांघरूण नसल्याने थंडीत कुडकुडावे लागत आहे.’’  

‘‘सकाळी मजुरीसाठी सगळे जण घरातून बाहेर गेलो, तर दुपारी घरात पाणी घुसल्याचा शेजारच्यांचा फोन आला, हातातले काम टाकून तसाच डेंगळे पूल गाठला, पण तोपर्यंत उशीर झाला होता. घरात कमरेएवढे पाणी जमा झाले होते. महत्त्वाची कागदपत्रे, थोडेफार पैसे व मुलांचे कपडे घेतले. मी तर तीन दिवसांपासून एकाच कपड्यावर आहे. सगळं अवघड झालंय,’’ असे आदिनाथ कांबळे यांनी सांगितले.  

सर्दी, तापाचे रुग्ण वाढले 
महापालिकेच्या शाळांमध्ये आरोग्य विभागाने उपचाराची व्यवस्था केली आहे. या ठिकाणी राहणाऱ्या पूरग्रस्तांमध्ये सर्दी, तापाचे रुग्ण वाढले आहेत. लहान मुलांना याचा जास्त त्रास होत आहे. डॉक्‍टरांकडून औषधे घेऊन थोडासा दिलासा मिळत आहे, असे नागरिकांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Citizens worried due to flood