नागरिकत्वासाठी ४ दशके फरफट

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 20 जुलै 2018

पुणे - मी पाकिस्तानातील कराची येथे राहत होतो. वयाच्या पंधराव्या वर्षी मी पिंपरी-चिंचवडला माझ्या काकांकडे आलो. भारतीय नागरिकत्व मिळावे म्हणून प्रयत्न केले. जिल्हाधिकारी कार्यालयाला अलीकडेच नागरिकत्व देण्यासंबंधीचे अधिकार दिले आहेत. पण, मला अनेकदा हेलपाटे मारावे लागले. तेव्हा कुठे ३६ वर्षांनी मला कायमस्वरूपी भारतीय नागरिकत्व मिळाले. आता मला रेशनकार्डसाठी अर्ज करायचा आहे, अशीच अवस्था बहुतांश पाकिस्तानी निर्वासित सिंधी नागरिकांची आहे, अशी माहिती राजेंद्र ठाकूर यांनी दिली.  

स्वातंत्र्यानंतर पाकिस्तान, अफगाणिस्तान, बांग्लादेश येथून भारतात स्थलांतरित झालेले अनेक नागरिक आहेत. त्यापैकीच पाकिस्तानातून आलेले सिंधी समाजाचे पाचशेहून अधिक नागरिक पुणे शहर, पिंपरी-चिंचवड येथे गेली अनेक वर्षे राहत आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयाने आवश्‍यक कागदपत्रे तपासून संबंधितांना नागरिकत्व द्यावे, असा अध्यादेश जारी केला आहे. मात्र, बहुतांश सिंधी नागरिकांना अद्यापही भारतीय नागरिकत्व मिळाले नाही. सिंधी नागरिकांना येथील नागरिकत्व द्यावे, या प्रमुख मागणीसाठी मेरे अपने ही संघटना व ओबाडो पंचायत ट्रस्टच्या सदस्यांसमवेत जिल्हाधिकारी कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत बैठकाही झाल्या. परंतु, कोणीच दाद देत नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. नागरिकत्व नसल्याने रेशनकार्ड, मतदार ओळखपत्र मिळणे अवघड झाले आहे. याबाबत जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

केंद्र सरकारने निर्वासित हिंदू नागरिकांसाठी कायमस्वरूपी नागरिकत्व देण्याचे अधिकार जिल्हाधिकारी कार्यालयास दिले. पण, प्रशासकीय यंत्रणेच्या अनागोंदी कारभारामुळे तीस-चाळीस वर्षांपासून 
राहणाऱ्या सिंधी नागरिकांना नागरिकत्वच मिळालेले नाही. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच निर्वासित सिंधी नागरिकांसमवेत उपोषण करणार आहे.
- बाळासाहेब रुणवाल, अध्यक्ष, मेरे अपने संघटना.  

सिंधी समाजातील नागरिकांच्या राष्ट्रीयत्वाच्या मुद्यासंदर्भात सरकारी पातळीवर पाठपुरावा सुरू आहे. पिंपरीमधील ओबाडो पंचायत अनेक दिवसांपासून हे काम करीत आहे. 
- जगदीश वासवानी, पदाधिकारी, आर्य समाज संस्था.

सिंधी समाजातील नागरिकांचा राष्ट्रीयत्वाचा मुद्दा मार्गी लावण्यासाठी समाजातील नागरिकांनी एकत्र येऊन विश्‍व सिंधी सेवा संगम संस्था या संस्थेची स्थापना केली आहे व त्यायोगे प्रश्‍न सोडवण्यासाठी प्रयत्नशील आहे.  
- मनोहर जेठवानी, पदाधिकारी, विश्‍व सिंधी सेवा संगम संस्था. 

Web Title: Citizenship Sindhi Society issue