शहराची डिजिटायझेशनच्या दिशेने वाटचाल

दीपेश सुराणा - सकाळ वृत्तसेवा 
शुक्रवार, 2 डिसेंबर 2016

पिंपरी - शहरात माहिती तंत्रज्ञानाचे जाळे विस्तारावे, लोकांचे दैनंदिन व्यवहार डिजिटल व्हावेत, यासाठी आवश्‍यक सेवा-सुविधा महापालिकेतर्फे उभारल्या जात आहेत. त्यामुळे शहराची वाटचाल आता डिजिटायझेशनच्या दिशेने सुरू होणार आहे. 

पिंपरी - शहरात माहिती तंत्रज्ञानाचे जाळे विस्तारावे, लोकांचे दैनंदिन व्यवहार डिजिटल व्हावेत, यासाठी आवश्‍यक सेवा-सुविधा महापालिकेतर्फे उभारल्या जात आहेत. त्यामुळे शहराची वाटचाल आता डिजिटायझेशनच्या दिशेने सुरू होणार आहे. 

पुणे व नागपूर महापालिकेच्या धर्तीवर शहर माहिती तंत्रज्ञानाने जोडले जावे, यासाठी आवश्‍यक सेवा-सुविधा विकसित करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. त्यासाठी आवश्‍यक सल्लागार संस्था नियुक्त करण्यास महापालिकेच्या स्थायी समिती सभेने मंजुरी दिली आहे. "स्मार्ट सिटी इनिशिएटिव्ह'अंतर्गत माहिती तंत्रज्ञानाशी संबंधित सेवा-सुविधा तयार करण्याच्या कामकाजास गती देण्यात येणार आहे. तसेच, महापालिकेतर्फे शहरात पुरविण्यात येणाऱ्या विविध सेवा-सुविधांमध्ये सुधारणा होणार आहे. तर नव्याने काही सुविधा नागरिकांना मिळणार आहेत. 

शहराच्या सर्वांगीण विकासासाठी शहरात डिजिटल इन्फ्रास्ट्रक्‍चर तयार होणे ही काळाची गरज झाली आहे. या योजनेमुळे माहिती आणि तंत्रज्ञान, इंटरनेट ऑफ थिंग्ज किंवा "आयओई' या तंत्रज्ञानाचा वापर करून वाय-फाय सेवा, इंटिलिजन्ट अर्बन ट्रान्स्पोर्ट, स्मार्ट ग्रीड/स्काडा, इन्फर्मेशन किओस्क, उत्कृष्ट पार्किंग व्यवस्था, पाणीपुरवठा, नागरी विकास आणि गृहयोजना, ऊर्जा, महापालिकेच्या विविध सेवा आदींना फायदा होणार आहे. 

शहराच्या विकासासाठी गुंतवणुकीचा अभ्यास, गुंतवणुकीचे विश्‍लेषण आणि गुंतवणूक उभारणी आदी बाबींवर भर द्यावा लागेल. शहराचा वारसा व संस्कृतीचे जतन करणे, शिक्षण सुविधा, आरोग्य, ऊर्जा, वाहतूक, घनकचरा, वाहन, पर्यावरण, पार्किंग व्यवस्थापन, जमीन आणि गृहनिर्माण व्यवस्थापन, आपत्ती व्यवस्थापन, नवीन उपक्रम आणि उद्योजकता हब, सार्वजनिक सेवांसाठी आयसीटी व्यासपीठ, सार्वजनिक उपयोगिता आयसीटी व्यवस्थापन, शहर सर्व्हिलन्स व्यवस्थापन व शहर नियंत्रण केंद्र, जीआयएस व्यवस्थापन, ई-गव्हर्नन्स, मोबाईल-गव्हर्नन्स, महापालिका संकेतस्थळाचे व्यवस्थापन, नागरिक आधार केंद्र आदी सेवा नागरिकांना उपलब्ध व्हाव्यात, म्हणून आवश्‍यक मार्गदर्शन महापालिकेने या प्रकल्पासाठी नियुक्त केलेल्या सल्लागार संस्थेमार्फत मिळणार आहे. 

संबंधित प्रकल्पासाठी विस्तृत प्रकल्प अहवाल तयार केला जाईल. निविदा मागविल्या जातील. या सर्व प्रक्रियेला सहा महिन्यांचा कालावधी लागेल. तर प्रत्यक्ष हा प्रकल्प पूर्ण होण्यासाठी दोन वर्षे लागणार आहेत. 

शहराच्या डिजिटायझेशनसाठी माहिती तंत्रज्ञानाशी संबंधित सेवा-सुविधा देण्यासाठी महापालिकेतर्फे नियोजन सुरू आहे. महापालिका विविध कर स्वीकारण्यासाठी ई-पेमेंट सुविधेचा वापर करीत आहे. भविष्यात मोबाईल वॉलेट, ई-वॉलेट, स्वॅपिंग मशिन आदी कॅशलेस सुविधाही सुरू केल्या जातील. शहरात सर्वत्र "वाय-फाय' सेवा सुरू करण्यासाठी पूर्ण तयारी करावी लागेल. 
निळकंठ पोमण, मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी,  पिंपरी-चिंचवड महापालिका. 

Web Title: The city is moving towards digitalisation