काही नेत्यांच्या घातपाताचा डाव 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 30 ऑगस्ट 2018

पुणे -  देशातील आणि राज्यातील वरिष्ठ राजकीय नेत्यांचा घातपात करण्याचा बंदी घालण्यात आलेल्या माओवादी संघटनांचा कट होता, अशी माहिती शहर पोलिसांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली. तसेच अटकेत असलेल्या पाचही मोओवादी नेत्यांनी समाजात अशांतता आणि अस्वस्थता निर्माण करण्यासाठी केलेल्या कृत्यांबाबतचा भरभक्कम पुरावा संकलित केला आहे, अशी माहिती त्यांनी या वेळी दिली. 

युवकांना भडकविण्यासाठी आणि समाजात अशांतता निर्माण करण्यासाठीच्या कृत्यांत सहभागी झाल्याच्या आरोपावरून वरवरा राव, अरुण परेरा, सुधा भारद्वाज, गौतम नवलाखा आणि वेरनोन गोन्साल्वीस यांना शहर पोलिसांनी मंगळवारी अटक केली आहे. या पार्श्‍वभूमीवर पोलिस आयुक्तालयात सहआयुक्त शिवाजी बोडखे यांच्या उपस्थितीत गुन्हे शाखेचे उपायुक्त शिरीष सरदेशपांडे यांनी निवेदन वाचून दाखविले. त्यात अटकेची कारणे आणि गुन्हेगारी कृत्यांतील त्यांचा सहभाग, या बाबतच्या मजकुराचा समावेश होता. पत्रकारांनी विचारलेल्या एकाही प्रश्‍नाला पोलिसांनी उत्तर दिले नाही. प्रश्‍नोत्तरे होणार नाहीत, असे त्यांनी सुरवातीलाच स्पष्ट केले होते. 

शनिवारवाड्याच्या मैदानावर 31 डिसेंबर 2017 रोजी झालेल्या एल्गार परिषदेबाबत विश्रामबाग पोलिस ठाण्यात 8 जानेवारी रोजी गुन्हा दाखल झाला आहे. त्या गुन्ह्यातील अटक आरोपींकडून मिळालेली माहिती आणि पुरावे, याच्या आधारे पाचही जणांना अटक झाली आहे. प्रस्थापित राजकीय व्यवस्था उलथवून टाकण्यासाठीच्या कटात सहभागी झाल्याचा भरभक्कम पुरावा हाती लागला आहे. तसेच त्या बाबतचा तपशीलवार पुरावा डिजिटल माध्यमातूनही गोळा करण्यात आला आहे, असे या वेळी सांगण्यात आले. एल्गार परिषदेनंतर उसळलेल्या हिंसाचाराला काही माओवादी नेतेही प्रत्यक्षरीत्या आणि अप्रत्यक्षरीत्या जबाबदार आहेत, अशा निष्कर्षाप्रत पोलिस आले आहेत. या बाबत गेले चार महिने झालेल्या सखोल तपासानंतर अटकेची कारवाई करण्यात आली आहे, असेही त्यांनी सांगितले. 

Web Title: City police press conference on Wednesday