शहरातील समस्यांबाबत पंतप्रधानांना साकडे

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 28 डिसेंबर 2016

पिंपरी - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 24 डिसेंबरला पुणे मेट्रोचे उद्‌घाटन झाले. या वेळी एकाच व्यासपीठावर असलेल्या महापौरांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवेदन देऊन शहरातील मात्र केंद्र शासनाशी संबंधित असलेल्या विषयांकडे लक्ष वेधले.

पिंपरी - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 24 डिसेंबरला पुणे मेट्रोचे उद्‌घाटन झाले. या वेळी एकाच व्यासपीठावर असलेल्या महापौरांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवेदन देऊन शहरातील मात्र केंद्र शासनाशी संबंधित असलेल्या विषयांकडे लक्ष वेधले.

स्वारगेट ते पिंपरी या मेट्रोच्या पहिल्या टप्प्याचे उद्‌घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 24 डिसेंबरला पुण्यात झाले. दोन शहरांना जोडणारी ही मेट्रो असल्याने व्यासपीठावर पुण्याचे महापौर प्रशांत जगताप व पिंपरीच्या महापौर शकुंतला धराडे या देखील होत्या. धराडे यांनी पंतप्रधान मोदी यांना पिंपरी-चिंचवड शहरातील केंद्र सरकारशी संबंधित असलेल्या समस्यांबाबत निवेदन दिले. यात स्वारगेट ते पिंपरी या प्रस्तावित मेट्रोऐवजी निगडी ते कात्रज अशी मेट्रोसेवा करावी, ही प्रमुख मागणी केली आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात रेडझोनमुळे महापालिकेचे अनेक प्रकल्प रखडले आहेत. याशिवाय लष्करी हद्दीच्या आसपास राहणाऱ्यांनाही घर बांधता येत नाही. यामुळे रेडझोनची हद्द कमी करावी, असे पंतप्रधान यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेची गुणवत्ता असूनही स्मार्ट सिटीच्या यादीतून वगळण्यात आले आहे.

दापोडी-बोपखेल हा सीएमईच्या हद्दीतून जाणारा रस्ता लष्कराने बंद केला. त्यानंतर येथील रहिवाशांसाठी तात्पुरता तरंगता पूल उभारण्यात आला होता. मात्र, सात जूनपासून हा पूलही लष्कराने काढून घेतला. यामुळे बोपखेलवासीयांना 12 ते 15 किलोमीटरचा वळसा घालून यावे लागते. येथील नागरिकांची अडचण टाळण्यासाठी भुयारी मार्ग, उड्डाण पूल उभारण्यासाठी परवानगी द्यावी किंवा सीएमईतील मार्ग पुन्हा सुरू करावा, अशी मागणीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलेल्या निवेदनात महापौर शकुंतला धराडे यांनी केली आहे. तसेच या निवेदनाची प्रत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही दिली असल्याचे महापौरांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

Web Title: City problems discussed with PM