समान काम, समान पदनामाची मागणी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 23 जानेवारी 2019

पुणे - ग्रामपंचायतीपासून मंत्रालयापर्यंत लिपिकांचे पदनाम एकच करावे, पदोन्नतीचे टप्पेही सारखेच असावेत आणि समान काम, समान वेतन द्यावे, लिपिकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी आणि सातव्या वेतन आयोगाचा तीन वर्षांचा फरक रोखीने द्यावा, यांसह विविध प्रलंबित मागण्यांसाठी जिल्ह्यातील सर्व विभागांतील लिपिकांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. 

महाराष्ट्र राज्य शासकीय व निमशासकीय लिपिकसंवर्गीय हक्क परिषदेच्या पुणे जिल्हा शाखेच्या वतीने हा मोर्चा काढण्यात आला. लिपिक संघटनेचे राज्य सरचिटणीस उमाकांत सूर्यवंशी, संघटक शिवाजी खांडेकर, संजय कडाळे, पुणे विभागाचे अध्यक्ष महेश शिंदे, पुणे जिल्हाध्यक्ष प्रसन्न कोतुळकर आदींच्या नेतृत्वाखाली काढलेल्या या मोर्चात पोलिस विभागातील लिपिकांचा अपवाद वगळता अन्य सर्व विभागांतील अडीच हजार लिपिक सहभागी झाले होते. 

दरम्यान, लिपिकांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांना मागण्यांचे निवेदन दिले. बक्षी समितीच्या शिफारशीनुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांप्रमाणे लिपिकांना आश्‍वासित प्रगती योजनेचा लाभ १०, २० आणि ३० या तीन टप्प्यांत द्यावा, लिपिकांच्या रिक्त जागा स्थायी स्वरूपात भराव्यात, अर्जित रजा साठवण्याची कमाल मर्यादा वाढवावी, कॅशलेस वैद्यकीय उपचार सुविधा द्यावी आणि लिपिकांना नियमित प्रशिक्षण द्यावे आदी मागण्या निवेदनात केल्या आहेत.

Web Title: Clark Agitation for Demand