दहावीच्या मराठीच्या पेपरसाठी 'कॉपी'

दहावीच्या मराठीच्या पेपरसाठी 'कॉपी'

पुणे : दहावीचा बदललेला अभ्यासक्रम आणि परीक्षेत नव्याने आलेली कृतिपत्रिका यांचा धसका विद्यार्थ्यांनी घेतला आहे. त्यामुळे पहिल्या दिवशी (शुक्रवारी) झालेल्या मराठीच्या पेपरसाठीदेखील त्यांनी कॉपीचा आधार घेतला आहे. परीक्षेच्या पहिल्या दिवशी राज्यात 111 कॉपीचे प्रकार घडले आहेत. 

राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाने कॉपी रोखण्यासाठी भरारी पथके नियुक्त केली आहेत. परंतु कॉपी प्रकार बंद होत नाहीत. त्यात परीक्षापद्धतीत झालेला बदल विद्यार्थ्यांपर्यंत व्यवस्थित पोचला की नाही, असाही प्रश्‍न या निमित्ताने उपस्थित होत आहे. मराठीच्या पेपरसाठी कॉपीचे सर्वाधिक 71 प्रकार नाशिक येथे घडले आहेत. औरंगाबाद येथे 21 आणि नागपूर येथे 12 प्रकार घडले आहेत. यात पुणे विभागही मागे नाही. दोन प्रकार याही विभागात घडले आहेत.

राज्य मंडळ भरारी पथके नियुक्त करीत असले, तरी त्यातील शिक्षक हे ठरलेलेच असतात. त्यामुळे पथकांचा प्रभाव राहत नाही. हा प्रकार माध्यमांनीच मंडळाच्या निदर्शनास आणून दिला होता. त्यानंतर भरारी पथकांमधील शिक्षक बदलण्याच्या सूचना करणार असल्याचे मंडळाच्या अध्यक्ष डॉ. शकुंतला काळे यांनी सांगितले होते. परंतु तशा सूचना शिक्षणाधिकारी आणि उपसंचालकांपर्यंत पोचल्या नसल्याचे या कार्यालयांकडून सांगण्यात आले.

कॉपीचे प्रकार वारंवार घडणाऱ्या संवेदनशील केंद्रावर बैठे पथक असते, त्यामुळे तेथील गैरप्रकारांवर निर्बंध येतात. अशाच प्रकारचे एक पथक तयार करून प्रत्येक केंद्रात ठेवण्याची मागणीही शिक्षकांकडून होत आहे. भरारी पथकांपेक्षा अशी बैठी पथके प्रभावी ठरतील, असेही त्यांचे मत आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com