दोन दिवसांमध्ये शहरातील खड्डे बुजवा ; पिंपरी महापौरांचे आदेश 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 12 जुलै 2018

""शहराच्या विविध भागांतील रस्त्यावर पडलेले 87 टक्के खड्डे बुजविले आहेत. उर्वरित खड्डे बुजविण्याचे काम सुरू आहे. अमृत योजनेत जलवाहिनी आणि सांडपाणी नलिका टाकण्याचे काम सुरू आहे. त्यासाठी रस्त्यांवर खोदाई केली जात आहे. विभागनिहाय संबंधित काम संपल्यानंतर तेथील खड्डे बुजविण्यात येत आहेत.'' 
- अंबादास चव्हाण, शहर अभियंता

पिंपरी : दोन दिवसांमध्ये शहरातील खड्डे बुजवा, असे आदेश महापौर नितीन काळजे यांनी गुरुवारी दिले. महापालिका प्रशासनाने विविध भागांमध्ये खड्डे बुजविण्यास सुरवात केली आहे. 

शहरामध्ये पिंपरी-रिव्हर रस्ता, नवमहाराष्ट्र विद्यालय ते पिंपरीगाव, साईनाथनगर, भक्ती-शक्ती उद्यान चौक ते त्रिवेणीनगर चौक, त्रिवेणीनगर चौक ते साने चौक, थरमॅक्‍स चौक ते यमुनानगर अशा विविध रस्त्यांवर खड्डे पडल्याचे सचित्र वृत्त "सकाळ'मध्ये बुधवारी (ता.11) प्रसिद्ध झाले. त्यानंतर लगोलग आज "मनसे'तर्फे याच विषयावर महापालिका भवनात ठिय्या आंदोलन करण्यात आले. तर, महापौर काळजे यांनी शहर अभियंता अंबादास चव्हाण यांना बोलावून खड्डे बुजविण्याचे आदेश दिले. 

निगडी येथील अमृतानंदमयी मठासमोर असलेल्या रस्त्यावरील खड्डे बुजविले आहेत. साईनाथनगर येथे खडी टाकून तेथील खड्डे देखील बुजविले आहेत. भक्ती-शक्ती उद्यान चौक ते त्रिवेणीनगर चौक येथील खड्डे बुजविण्याचे काम सुरू आहे. त्याशिवाय, महापालिकेतर्फे शहरातील विविध भागांमध्ये खड्डे बुजविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.

Web Title: Clean city within two days Order of Pimpri Mayor