आरटीओ परिसर होणार स्वच्छ, सकाळ बातमी परिणाम 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 7 नोव्हेंबर 2018

पुणे : प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या (आरटीओ) मुख्य इमारतीसह तेथील स्वच्छतागृहे, आणि कार्यालयाचा आवार स्वच्छ होणार असून, नियमित स्वच्छतेची कामे करण्याचा आदेश संबंधितांना देण्यात आला आहे. तसेच, या कामावर देखरेख ठेवण्यात येणार असल्याचे प्रादेशिक परिवहन अधिकारी (आरटीओ) बाबासाहेब आजरी यांनी सांगितले आहे. त्यामुळे पुणे आरटीओचा परिसर चकाचक होणार आहे. येथील अस्वच्छतेबाबतचे वृत्त "सकाळ'मध्ये 2 तारखेला प्रसिद्ध झाले होते. 

आरटीओमधील पुरुष आणि महिलांची आठपैकी सहा स्वच्छतागृहे गोदामाच्या स्थितीत असल्याचे आढळून आले. त्यात, जुनी कागदपत्रे आणि फायली ठेवण्यात आल्या होत्या. तसेच स्वच्छतागृहाच्या फर्निचरची तोडफोड झालेली होती. त्यातील काही स्वच्छतागृहांना कुलूप लावण्यात आलेले होते. त्यामुळे येथे येणाऱ्या हजारो नागरिकांची मोठीच गैरसोय होत होती. तसेच परिसरातील अस्वच्छता आणि अपंगांच्या सुविधांचाही प्रश्‍न गंभीर झाला असल्याचे दिसून आले होते. याबाबत "सकाळ'ने लक्ष वेधल्यानंतर, आजरी यांनी याबाबत सुधारणा करण्यासाठी संबंधितांना आदेश दिले आहेत. 

स्वच्छतागृहे आणि कार्यालयाच्या परिसराची स्वच्छता ही ठेकेदारांकडे असल्याने संबंधित ठेकेदारास लवकरात लवकर सुधारणा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान, कार्यालयातील स्वच्छतागृहामधील कागदपत्रे आणि फायली दुसऱ्या ठिकाणी हलविण्यात आल्या आहेत. बंद असलेली स्वच्छतागृहे खुली करण्याचे आदेशही संबंधिंतांना देण्यात आल्याचे आजरी यांनी सांगितले. तसेच लाखो रुपये खर्च करुन बांधण्यात आलेला अपंगासाठीच्या रॅंपला पार्किंगचा विळखा पडला होता. त्याबाबत रॅंपच्या प्रवेशद्वारावर वाहने उभी करण्यास बंदी घालण्यात आली असून, वाहने उभी करणाऱ्यावर कारवाई करण्यात येणार आहे. 
 
"प्रादेशिक परिवहन कार्यालयामधील बंद स्वच्छतागृहे आणि परिसरातील अस्वच्छता याविषयी माहिती घेऊन संबंधितांना याबाबत आदेश दिले आहेत. स्वच्छतागृहाचा प्रश्‍न गंभीर असल्याने स्वच्छतागृहाची साफसफाई करण्यात येऊन नागरिकांसाठी ती वापरण्यास खुली करण्यात आली आहेत. तसेच परिसराच्या स्वच्छतेचे आदेश देण्यात आले आहेत.'' 
- बाबासाहेब आजरी, मुख्य कार्यकारी अधिकारी, प्रादेशिक परिवहन कार्यालय 

Web Title: Clean up the RTO campus