स्वच्छतेचा दिखाऊपणा पालिकेला नडला

स्वच्छतेचा दिखाऊपणा पालिकेला नडला

पुणे - शहरातील सार्वजनिक स्वच्छतागृहांची देखभाल आणि साफसफाईवर वर्षागणिक कोट्यवधी रुपये खर्च करूनही ती अस्वच्छ असल्याची बाब महापालिकेला नडल्याचे उघड झाले आहे. तसेच घरोघरी जाऊन कचरा गोळा करणे आणि स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या बेजबाबदारपणामुळेच केंद्र सरकारच्या स्वच्छ सर्वेक्षणात पुणे शहराची पीछेहाट झाली आहे. अस्वच्छ स्वच्छतागृहे, कचरा संकलनाकडे दुर्लक्ष, यामुळेच सर्वेक्षणात कमी गुण मिळाल्याची कबुली महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांनी सर्वसाधारण सभेत दिली. 

दिखाऊपणा केल्यामुळेच स्वच्छ स्पर्धेत क्रमांक घसरल्याचा आरोप करून विरोधकांनी सत्ताधारी भाजपची कोंडी केली. तरीही सर्वेक्षणात कामगिरी खालावल्यानंतरही जुन्या उपाययोजनांची नावे सांगून सत्ताधाऱ्यांनी आपली पाठ थोपटून घेतली. सत्ताधारी-विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपाचा सामना रंगला. 

स्वच्छतेच्या उपाययोजना नसल्याने स्वच्छ सर्वेक्षणात शहराचा ३७ वा क्रमांक आला आहे. तर राज्यात आठव्या क्रमांकावर आहे. या मोहिमेत सल्लागार नेमण्यापासून अन्य कामांवर कोट्यवधी खर्च झाले आहेत. या निकालाचे यशापयश शोधण्याची स्पर्धा सत्ताधारी भाजप आणि प्रशासनात लागली आहे. तेव्हाच निंबाळकर यांनी अभियानांतर्गत केलेल्या कामांची माहिती सभागृहात दिली. 

ते म्हणाले, ‘‘शहरातील स्वच्छतागृहांची स्थिती चांगली नसल्याचे पाहणीतून दिसले. त्यासाठी २५ टक्के गुण होते. शिवाय, घरोघरी जाऊन कचरा गोळा करण्यातही यंत्रणा अपुरी ठरली आहे. झोपडपट्ट्यांमधील कचरा उचलण्यात कमी पडलो. कचऱ्यासंदर्भात शंभर टक्के कमी पडलो आहोत. या बाबींचा परिणाम स्वच्छच्या निकालातून दिसला. ज्यांच्याकडे स्वच्छतेच्या कामांची जबाबदारी आहे, त्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचे काही प्रमाणात दुर्लक्ष होत आहे.’’

‘‘शहर स्वच्छ ठेवण्यासाठी दोन वर्षात महापालिकेने उत्तम कामगिरी केल्याने केंद्र सरकारचे पुरस्कार मिळाले आहेत. त्यामुळे स्वच्छतेच्या उपाययोजना नाहीत, असे ठरविणे चुकीचे आहे, असे सांगून प्रशासनाने कामांकडे लक्ष द्यावे, अशी अपेक्षा सत्ताधाऱ्यांनी व्यक्त केली.  

अर्थसंकल्पात दोन वर्षापूर्वी जाहीर केलेली भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयाची योजना पुढे सरकली नसल्याचे सांगत, आयुक्त राव हे निष्क्रिय आहेत, अशी टीका मुरलीधर मोहोळ यांनी केली. यांसदर्भात विरोधी प्रश्‍न उपस्थित केला होता. दरम्यान, योजनेसाठी नेमलेल्या सल्लागाराला कामाचा आदेश  दिला.

पुणे स्वच्छ का केले नाही
सर्वसाधारण सभेचे कामकाज सुरू होताच, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सदस्यांनी सत्ताधाऱ्यांसह प्रशासनाला जाब विचारला. एवढे कार्यक्रम, पैसा खर्च करूनही पुणे स्वच्छ का केले नाही, असा प्रश्‍न विरोधकांनी लावून धरला. त्यावरून सत्ताधारी-विरोधकांत जुगलबंदी रंगली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com