दौंड रेल्वे स्थानकावर यंत्राद्वारे स्वच्छता

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 23 ऑगस्ट 2018

दौंड - दौंड रेल्वे स्थानकावर यंत्राच्या मदतीने स्वच्छता सुरू करण्यात आली आहे. स्वच्छतेसाठी महिन्याला १ लाख १२ हजार ५०० रुपयांचा खर्च केले जाणार आहे. रेल्वे स्थानक स्वच्छ ठेवण्यासाठी एकूण ६० कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. 

दौंड - दौंड रेल्वे स्थानकावर यंत्राच्या मदतीने स्वच्छता सुरू करण्यात आली आहे. स्वच्छतेसाठी महिन्याला १ लाख १२ हजार ५०० रुपयांचा खर्च केले जाणार आहे. रेल्वे स्थानक स्वच्छ ठेवण्यासाठी एकूण ६० कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. 

रेल्वे स्थानकाचे व्यवस्थापक सॅम्युएल क्‍लिफ्टन यांनी सोमवारी (ता. २०) याबाबत माहिती दिली. स्थानकावर दररोज किमान ८० प्रवासी गाड्यांची ये - जा सुरू असते. ३० गाड्या दररोज किमान २० मिनिटांसाठी फलाटांवर इंजिन बदलण्यासाठी थांबतात. या कालावधीत प्रवासी विविध कारणांसाठी फलाटावर उतरत असल्याने मोठ्या प्रमाणावर कचरा तयार निर्माण होतो. तसेच फलाटाच्या फरशा खराब होतात. लोहमार्गावर कचरा व उरलेले अन्नपदार्थ फेकणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. 

दौंड स्थानकाच्या फलाटांची लांबी, रुंदी आणि गाड्यांच्या वाढत्या संख्येचा विचार करता प्रशासनाने कंत्राटी पद्धतीने स्वच्छतेची कामे दिली आहेत. चार वर्षांच्या कंत्राटासाठी रेल्वे ५ कोटी ४० लाख रुपये मोजणार आहे. नवीन कंत्राटानुसार सकाळच्या सत्रात ४० व रात्रीच्या सत्रात २० कर्मचाऱ्यांकडून स्वच्छता केली जाणार आहे. तीन पर्यवेक्षकांसह रेल्वेचे मुख्य आरोग्य निरीक्षक स्वच्छतेच्या कामावर नियंत्रण ठेवणार आहे. कंत्राटात फलाटांसह पादचारी पुलाचा समावेश करण्यात आला आहे. स्वच्छतेसाठी बॅटरी ऑपरेटेड स्क्रबर्स, व्हॅक्‍यूम क्‍लीनर्सचा वापर सुरू करण्यात आला आहे. 

रेल्वे मंत्रालयाने स्वच्छतेविषयक केलेल्या एका सर्वेक्षणात सोलापूर विभागात दौंड स्थानकाने प्रथम स्थान पटकावले आहे. स्वच्छतेच्या प्रमाणात ४० टक्के वाढ झाल्याची माहिती क्‍लिफ्टन यांनी दिली. 

स्थानकाची वैशिष्ट्ये  
दररोज १० हजार ९०० प्रवाशांची ये - जा.
फलाट क्रमांक २, ५ व ६ ची लांबी - प्रत्येकी ६९५ मीटर
फलाट क्रमांक १ व ३ ची लांबी अनुक्रमे ३८० व ३९० मीटर
फलाट क्रमांक ४ ची लांबी ३२० मीटर
सरासरी फलाटांची रुंदी १५ मीटर

Web Title: Cleanliness by machine at Daund Railway Station