कोंडी फोडणाऱ्या प्रकल्पांना हिरवा कंदील

उमेश शेळके
शुक्रवार, 30 डिसेंबर 2016

गेली काही वर्ष चर्चेत आणि कागदावरच राहिलेले; परंतु शहरातील वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाचे असलेले प्रकल्प पुढील वर्षी मार्गी लागण्याची चिन्हे आहेत. शहरातील वाहतुकीची कोंडी फुटण्यासाठी हे प्रकल्प महत्त्वाचे ठरणार आहेत. सरत्या वर्षात या प्रकल्पांना केंद्र आणि राज्य सरकारने हिरवा कंदील दाखवला आहे. नव्या वर्षात त्यांची प्रत्यक्षात कामे सुरू होतील आणि गर्दीने कोंडलेले रस्ते मोकळे श्‍वास घेतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

गेली काही वर्ष चर्चेत आणि कागदावरच राहिलेले; परंतु शहरातील वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाचे असलेले प्रकल्प पुढील वर्षी मार्गी लागण्याची चिन्हे आहेत. शहरातील वाहतुकीची कोंडी फुटण्यासाठी हे प्रकल्प महत्त्वाचे ठरणार आहेत. सरत्या वर्षात या प्रकल्पांना केंद्र आणि राज्य सरकारने हिरवा कंदील दाखवला आहे. नव्या वर्षात त्यांची प्रत्यक्षात कामे सुरू होतील आणि गर्दीने कोंडलेले रस्ते मोकळे श्‍वास घेतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

शहराचे तसे अनेक प्रश्‍न आहेत; परंतु गेल्या काही वर्षांत वाहतूक कोंडी हा प्रश्‍न अधिक तीव्रतेने जाणवू लागला आहे. पुणेकरांच्या चर्चेतही हाच विषय प्राधान्याने मांडला जात आहे. प्रत्यक्षात मात्र ही कोंडी फोडण्यासाठी म्हणावे तसे प्रयत्न झाले नाहीत. अनेक योजना आल्या, कधी राजकीय तर कधी स्वयंसेवी संस्था यांनी उपस्थित केलेल्या शंका-कुशंकांमुळे या योजना प्रत्यक्षात येऊ शकल्या नाहीत. मात्र वर्ष संपत असतानाच पुणे आणि पीएमआरडीएची मेट्रो, बीआरटीचे जाळे, पुणे-दौंड रेल्वे मार्गाचे विद्युतीकरण, रिंगरोड, लोहगाव विमानतळाचे विस्तारीकरण आणि परिसरातील रस्ते सुधारणा, अशा अनेक शहराच्या वाहतुकीवर परिणाम करणाऱ्या प्रकल्पांना केंद्र आणि राज्य सरकारकडून मंजुरी मिळाली. एवढेच नव्हे प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून हाती घेण्यात आलेली "सारथी' प्रणाली, वाहन परवाना देण्यासाठी नवीन टेस्टिंग ट्रॅक, वाहन परवाना देण्याच्या आणि वाहनांना योग्यता प्रमाण देण्याच्या पद्धतीतील बदल, ई-रिक्षांना परवानगी, पीएमपीच्या ताफ्यात नवीन बसची खरेदी या निर्णयांमुळे शहरातील वाहतूक सुरळीत होण्यासाठी मदत होणार आहे.
मेट्रो, रिंगरोड यासारखे प्रकल्प पूर्णत्वास येण्यास आणखी काही वर्षे लागतील. परंतु, नव्या वर्षात किमान या कामांचे नारळ कसे फुटेल आणि प्रत्यक्ष कामाला सुरवात कशी होईल, हे आव्हान शासन आणि लोकप्रतिनिधी यांच्या पुढे आहे. राजकीय कारण पुढे करून सरकारी बाबूंनी आतापर्यंत आपली जबाबदारी झटकण्याचे काम केले. आता मात्र हे प्रकल्प वेळेत कसे मार्गी लागतील, यासाठी इच्छाशक्ती दाखविण्याची गरज आहे. पुणे शहराची एकूण लोकसंख्या आणि त्यात दरमहा पडणाऱ्या वाहनांची भर पाहिली, तर दिल्ली शहरासारखी पुणे शहराची स्थिती होण्यास फारकाळ थांबावे लागणार नाही. ज्या गतीने वाहने आणि प्रदूषण वाढत आहे, हे पाहता आधीच उशीर झाला आहे, आणखी उशीर या शहराला परवडणारा नाही. त्यामुळेच आगामी वर्ष हे किमान शहरातील वाहतूक सुसाह्य करणारे असेल, एवढीच माफक अपेक्षा पुणेकरांची आहे.

असे आहेत नव्या वर्षातील प्रकल्प
- पुणे-दौंड लोकल
- रिंगरोडच्या कामास प्रत्यक्ष सुरवात
- आंतरराष्ट्रीय विमानतळाचे भूसंपादन व इतर प्रक्रिया
- लोहगाव विमानतळाचे विस्तारीकरण
- वाहन परवान्यासाठी नवीन टेस्टिंग ट्रॅक

Web Title: Clearance projects in transport