चुणचुणीत रोशन शांत झाला... कायमचाच 

चुणचुणीत रोशन शांत झाला... कायमचाच 

उंड्री : रोशन त्याचे नाव. वडील ज्या सोसायटीचे सुरक्षारक्षक म्हणून काम करत होते, त्याच सोसायटीच्या गणेशोत्सव स्पर्धेत अवघ्या 13 वर्षांचा रोशन प्रथम क्रमांक पटकवायचा. आई-वडील अल्पशिक्षित होते, तरी रोशन मात्र छान इंग्रजी बोलायचा. रविवारी सायंकाळी सायकल खेळत होता आणि त्याच वेळी पाठीमागून आलेला भरधाव टॅंकर रोशनच्या कोवळ्या अंगावर गेला. बघता बघता खेळकर, चुणचुणीत रोशन शांत झाला, तो कायमचाच ! 

हांडेवाडी रस्त्यावर ईपीसी वास्तू ही सोसायटी आहे. मूळचे नेपाळचे असलेले चंद्रसिंग बिस्ट या सोसायटीमध्ये सुरवातीपासूनच सुरक्षारक्षक म्हणून काम करतात. पत्नी व दोन मुलांसमवेत सोसायटीतील एका खोलीमध्ये ते राहतात. दरम्यान, रविवारी शाळेला सुट्टी असल्याने काही वेळ रोशन त्याच्या छोट्या भावाबरोबर घरामध्ये खेळला. त्यानंतर उन्हे उतरतीला लागल्यानंतर रोशनने सायकल चालवायला सुरवात केली. सायंकाळी साडेसात वाजता तो सोसायटीच्या प्रवेशद्वाराजवळ खेळण्यात गुंतला होता. त्याच वेळी भरधाव आलेल्या पाण्याच्या टॅंकरने (एमएच 12 एफझेड 2959) दिलेल्या धडकेमध्ये रोशनचा मृत्यू झाला. 

केवळ रोशनच्या कुटुंबीयांवरच नाही, तर त्याच्याबरोबर खेळणाऱ्या सोसायटीतीमधील प्रत्येक लहान मुले आणि त्यांच्या पालकांच्याही मनावर हा तीव्र आघात झाला. त्यामुळेच ईसीपी वास्तूतील रहिवासी रविवारी रात्री उशिरापर्यंत तरवडेवस्ती पोलिस चौकीत संबंधित टॅंकरचालकासह मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यासाठी थांबले होते. रोशनच्या आई रोमीता चंद्रसिंग बिस्ट यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी टॅंकरचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला. 

वर्धमान इंग्रजी माध्यमाच्या शाळेत रोशन चौथीमध्ये शिकत होता. लहानगा रोशन वडिलांना कामामध्ये मदतही करत होता. त्यामुळेच त्याच्या जाण्याने सोसायटीतील प्रत्येकाला अक्षरशः रडविले ! त्याला एक लहान भाऊ आहे. सोसायटीच्या सर्व नागरिकांचा तो लाडका होता. या घटनेनंतर सोसायटीतील सर्वांच्या डोळ्यांत अश्रू होते. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com