बंद सिग्नल...रस्त्याची खोदाई

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 17 जुलै 2019

पोलिसांनी लक्ष द्यावे
जुन्या पुणे-मुंबई रस्तावर मेट्रोचे काम सुरू असल्यामुळे या रस्त्यावरून पुण्याकडे ये-जा करणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे सेवा रस्त्याची दुरुस्ती करणे, बेकायदा पार्किंगवर कारवाई करणे, याकडे महापालिका प्रशासन आणि पोलिसांनी लक्ष देण्याची आवश्‍यकता असल्याचे सोमनाथ भोसले या नागरिकाने सांगितले.

पिंपरी - बंद सिग्नल, सेवा रस्त्यातील बेकायदा पार्किंग, बेशिस्त वाहनचालक, रस्त्याची खोदाई आणि वाहतूक कोंडी या समस्यांमुळे रावेत ते सांगवी फाटा दरम्यानचा रस्ता धोकादायक झाला आहे. ‘सकाळ’ने केलेल्या पाहणीमध्ये ही वस्तुस्थिती समोर आली आहे. 

रावेतमधील बास्केट पूल परिसरातून पुण्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर पुनावळे कॉर्नरजवळील सिग्नल अनेक दिवसांपासून बंद आहेत. त्यामुळे चौकामध्ये येणाऱ्या वाहनचालकांचा गोंधळ उडतो. काही दिवसांपूर्वी भुयारी केबल टाकण्यास सुरवात झाली आहे. त्यामुळे हा रस्ता अरुंद झाल्याने कोंडी होत आहे. वाकड फाटा परिसरात पदपथावर पार्किंगची समस्या मोठी असून, सेवा रस्ताही खराब झाला आहे. त्यामुळे या रस्त्याचा वापर करणाऱ्या पादचारी आणि वाहनचालकांची कोंडी होत आहे. थेरगावमधील गुजरनगर, लक्ष्मीनगर परिसरातील सेवा रस्ता वाहनांनी व्यापलेला असतो. त्यामुळे सकाळी आणि संध्याकाळी येथे कोंडी होते. वाहतूक पोलिसांकडून कारवाई होत नसल्यामुळे बऱ्याचदा उड्डाण पुलावरून येणाऱ्या वाहनांची रांग लागते.

सांगवी फाट्याकडून रावेतकडे जाणाऱ्या रस्तालगतच्या परिसरात टेम्पोमधून फळे, भाज्यांची विक्री करणारे ठाण मांडून असतात. नागरिक खरेदीसाठी थांबत असल्याने सांगवी फाटा ते पिंपळे गुरवकडे जाणारा रस्ता अरुंद होत आहे. महापालिकेकडून त्यावर कोणतीही कारवाई होत नाही. 

पार्क स्ट्रीट परिसरात महापारेषणचा टॉवर मध्यभागी आल्यामुळे वाहनांना वळण्यासाठी करण्यात आलेला भुयारी मार्ग अनेक दिवसांपासून बंद आहे. मात्र दुचाकीस्वार त्यातून वाट काढत असतात. कस्पटे वस्तीकडे जाणाऱ्या रस्त्यालगत सिमेंटचे पाइप पडले आहेत. तर ताथवडे परिसरातील रघुनंदन मंगल कार्यालय चौकातील सिग्नल अनेक दिवसांपासून बंद आहे.  सेवा रस्त्यावर विरुद्ध दिशेने येणाऱ्या वाहनांची संख्यादेखील मोठी आहे. त्यामुळे या ठिकाणी अपघाताची शक्‍यता आहे.

खड्डेदुरुस्ती तातडीने 
सध्या पावसाने उघडीप घेतली आहे, त्यामुळे या रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांच्या दुरुस्तीचे काम तातडीने हाती घेण्यात येणार असल्याचे महापालिकेतील बीआरटी विभागाचे प्रवक्‍ते विजय भोजने यांनी सांगितले.

सांगवी फाटा ते रावेतदरम्यानच्या सेवा रस्त्यावर होणाऱ्या बेकायदा पार्किंगवर जॅमरची कारवाई करण्यात येणार आहे. येत्या काही दिवसांमध्ये वाहतूक पोलिसांना वाहने उचलण्यासाठी टेंपा उपलब्ध होणार आहे. त्यानंतर कारवाईचा वेग वाढेल. 
- नीलिमा जाधव, सहायक पोलिस आयुक्‍त, वाहतूक


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Close Signal Road Digging