वीर धरणातून विसर्ग 17 दिवसांनी बंद 

संतोष शेंडकर
मंगळवार, 13 ऑगस्ट 2019

नीरा खोऱ्यातील वीर, भाटघर, नीरा देवघर, गुंजवणी या चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कमी झाल्याने वीर धरणाचे सर्व दरवाजे आज 17 दिवसांनी पूर्णपणे बंद करण्यात आले. त्यामुळे नीरा नदीकाठच्या गावांना दिलासा मिळाला आहे. 

 सोमेश्नवरनगर (पुणे) : नीरा खोऱ्यातील वीर, भाटघर, नीरा देवघर, गुंजवणी या चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कमी झाल्याने वीर धरणाचे सर्व दरवाजे आज 17 दिवसांनी पूर्णपणे बंद करण्यात आले. त्यामुळे नीरा नदीकाठच्या गावांना दिलासा मिळाला आहे. 

नीरा नदीच्या खोऱ्यातील वीर, भाटघर, नीरा देवघर, गुंजवणी या चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात जुलैअखेर जोरदार पाऊस सुरू झाला आणि चारही धरणे भरली. त्यामुळे 27 जुलैपासून नीरा नदीमध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला. तीन ऑगस्टनंतर विसर्गामध्ये कमालीची वाढ करण्यात आली. त्यामुळे नदीकाठच्या गावांना हाय ऍलर्ट देण्यात आला. पाच ते आठ ऑगस्टपर्यंत 1 लाख क्‍युसेकच्या आसपास नदीमध्ये विसर्ग होत होता. त्यामुळे महापूर स्थिती निर्माण झाली. त्यामुळे नदी काठची बारामती व इंदापूर तालुक्‍यातील गावे बाधित झाली. यानंतरही नदीच्या पाणलोट क्षेत्रात कमी अधिक पाऊस सुरू राहिला. त्यानुसार नदीमधला विसर्गही कमी अधिक होत होता. मागील चार दिवसांपासून 32 हजार क्‍युसेक; तर सोमवारी साडेचार हजार क्‍युसेकवर विसर्ग आला आणि आज वीर, भाटघरला पावसाचे प्रमाण पूर्ण घटल्याने वीर धरणाचे सर्व दरवाजे बंद करण्यात आले. 

वीर 89 टक्के, भाटघर 97.94 टक्के, गुंजवणी 95.22 टक्के; तर देवघर 92.36 टक्के भरले आहे. मागील चोवीस तासात वीरच्या पाणलोट क्षेत्रात एक मिलिमीटर, भाटघरच्या पाणलोट क्षेत्रात दहा मिलिमीटर, गुंजवणीच्या पाणलोट क्षेत्रात 23 मिलिमीटर; तर नीरा देवघरच्या पाणलोट क्षेत्रात 84 मिलिमीटर पावसाची नोंद झाली, अशी माहिती पाटबंधारे विभागाचे सहायक अभियंता विजय नलावडे यांनी दिली. 

कोणत्याही क्षणी पुन्हा विसर्ग 
सध्या जोरदार पाऊस नसल्याने पुराचा धोका पुन्हा संभवत नाही, असे चित्र आहे. मात्र, नीरा देवघरला अजून पाऊस सुरू आहे. त्यामुळे नदीमध्ये कोणत्याही क्षणी पुन्हा विसर्ग केला जाऊ शकतो.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Closure of 17 days after discharge from Veer dam