कापडगंज भागात कोंडी अन अतिक्रमणांचा विळखा 

कापडगंज भागात कोंडी अन अतिक्रमणांचा विळखा 

पुणे - रविवार पेठेतील कापडगंज भाग हा पारंपरिक कपड्यांप्रमाणेच आधुनिक फॅशन जपणारा आणि सव्वाशेवर वर्षांची परंपरा असलेला मॉलच आहे, मात्र, वाढत्या लोकसंख्येमुळे वाहतूक कोंडी आणि अतिक्रमणांच्या विळख्याची समस्या येथील नागरिक आणि व्यावसायिकांपुढे आहे. याकडे दुर्लक्ष करणाऱ्या वाहतूक पोलिसांनी आणि महापालिकेने तातडीने उपाय योजण्याची मागणी या व्यापाऱ्यांनी केली आहे. 

"सकाळ'ने आयोजित केलेल्या बैठकीस रविवार पेठ कापड व्यापारी संघटनेचे अध्यक्ष उमेश झंवर, हरीश मुंदडा, चंदन मुंदडा, भगीरथ भुतडा, योगेश भुतडा, जुगलकिशोर मुंदडा, गौरव मुंदडा, विष्णू कालिया, राधेश्‍याम डागा, सुनील मुच्छाल, लालचंद हिंदुजा; तसेच पुणे व्यापारी महासंघाचे सचिव महेंद्र पितळिया आदी उपस्थित होते. 

रविवार पेठेतील वाढते घाणीचे साम्राज्य आणि वाहनांच्या कर्णकर्कश आवाजाचा व्यावसायिकांना त्रास होतो. अधिक भाडे देऊनही गर्दीमुळे रिक्षाचालक तेथे जायला तयार होत नाहीत. अतिक्रमण कारवाईनंतर पुन्हा अतिक्रमण होते. याबाबत तक्रारी करूनही महापालिका आणि वाहतूक पोलिस त्याची दखल घेत नसल्याची तक्रार व्यापाऱ्यांनी केली. महापालिकेने दुचाकी वाहनांसाठी पार्किंग आणि वाहतूक नियंत्रणासाठी दोन वाहतूक पोलिसांची नियुक्ती करावी, दररोज स्वच्छता कर्मचाऱ्यांनी स्वच्छता करावी, पथारीवाल्यांसाठी निश्‍चित ठिकाण द्यावे आदी मागण्या व्यापाऱ्यांनी केल्या. 

पारंपरिक साड्यांसाठी रविवार पेठ ओळखली जाते. लग्न बस्त्याच्या खरेदीसाठी ग्राहक येथे येतात. मांजरपाट ते पैठणीपर्यंतचे वैविध्य या बाजारात आहे. गढवाल, कोचमपल्ली, नारायण पेठ, मौनाथभंजन, मदुराई, मुबारकपूर, सुरत, बंगलोर, म्हैसूर, बनारस यांसारख्या ठिकाणांहून येथे साड्या विक्रीसाठी आणल्या जातात. 

दरम्यान, माहेश्‍वरी समाजाच्या श्रीराम मंदिर ट्रस्ट या ठिकाणी 300 दुचाकी वाहनांसाठी सशुल्क वाहनतळ उभारणार असून, त्यामुळे पार्किंगचा प्रश्‍न काही अंशी सुटू शकतो, असे व्यापाऱ्यांनी सांगितले. 

आधुनिक पद्धतींचा अवलंब 
आता कालबाह्य होत असलेल्या नऊवारी साडीचा ट्रेंड पुन्हा दिसू लागला असून, फॅशन म्हणून त्या साड्यांना मागणी येते आहे. तरीही बदलत्या काळानुसार साड्यांची मागणी 20 टक्‍क्‍यांनी कमी झाली असून, धोतरविक्रीची तीन-चार दुकानेच राहिली आहेत. ताग्यातून कापड फाडून कपडे शिवण्याची पद्धत मागे पडली आहे. त्यामुळे ड्रेस मटेरिअल, तयार कपडे आदी आधुनिक पद्धतींचा अवलंब व्यापाऱ्यांनी केला आहे. 

- रविवार पेठेत 250 कापड व्यापारी 
- पेशवे काळापासून प्रसिद्ध असलेल्या एकट्या कापडगंजमध्ये 500 कोटींची उलाढाल 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com