ढगाळ हवामानामुळे थंडी पळाली

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 17 नोव्हेंबर 2016

पुणे -  दक्षिण कोकणाच्या समुद्र किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे मध्य महाराष्ट्र व कोकणच्या काही भागांत बुधवारी पावसाच्या हलक्‍या सरी पडल्या. कोकण, मध्य महाराष्ट्रातील काही भागांत ढगाळ हवामानाची स्थिती असल्याने गेल्या काही दिवसांपासून पडणारी थंडी पळाली आहे. पुढील चोवीस तासांमध्ये आकाश अंशतः ढगाळ राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.

राज्यात सर्वांत कमी तापमान नागपूर येथे 12.5 अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. पुण्यात गेल्या आठवड्यात 9.4 अंश सेल्सिअसपर्यंत घसरलेला कमी तापमानाचा पारा आता 17.9 अंश सेल्सिअसपर्यंत वाढला आहे. ढगाळ वातावरणामुळे राज्यातील रात्रीचे तापमान वाढले आहे. अशीच स्थिती अजून तीन दिवस कायम राहील, असे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

राज्याच्या उर्वरित भागांत किमान तापमान सरासरीच्या जवळपास होते. मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली; तर कोकण, गोव्याच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. विदर्भाच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाली.

पावसाच्या हलक्‍या सरी
जिल्ह्यातील खेड शिवापूर आणि जुन्नर भागात पावसाच्या हलक्‍या सरी पडल्या. राज्यातील कोल्हापूर व सांगली जिल्ह्याच्या परिसरातही पावसाने हजेरी लावली. दुपारच्या तापमानात वाढ होत असल्याने दुपारी उन्हाचा चटका जाणवत आहे.

Web Title: Cloudy and cold weather back