मुसळधार पावसाने फुटणार होते तळे...ग्रामस्थांनी `असे` वाचवले शेतशिवार

ambegaon.jpg
ambegaon.jpg

पुणे : आंबेगाव तालुक्यातील सातगाव पठार, धामणी, पोंदेवाडी, खडकवाडी व पहाडदरा परिसरात आज ढगफुटीसदृश पावसाने धुमाकूळ घातला. या पावसाने ओढे- नाल्यांना पूर आला. अनेक ठिकाणी शेतामध्ये पाणी घुसून नुकसान झाले. घरांमध्ये पाणी आल्यामुळे तारांबळ उडाली. 


पारगाव : आंबेगाव तालुक्यातील धामणी, पहाडदरा व पोंदेवाडी परिसरात आज (ता. १९) ढगफुटीसदृश पावसाने ओढ्या नाल्यांना पूर आला. पुराचे पाणी आजूबाजूच्या शेतात घुसून शेतजमिनीचे व पिकांचे मोठे नुकसान झाले. या परिसरात सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास पावसाला सुरवात झाली. पावसाचा जोर जास्त असल्यामुळे ओढे- नाल्यांना पूर आला होता. ओढ्यावरील बंधारे तुडुंब भरून पुराचे पाणी बाजूच्या शेतात घुसले. त्यामुळे शेतजमिनीचे व पिकांचे मोठे नुकसान झाले. गावाजवळील पुलावरून पुराचे पाणी वाहू लागले. त्यामुळे काहीकाळ वाहतूक ठप्प झाली होती. कृषीविभागाच्या वतीने संबंधित नुकसानीचे पंचनामे करून त्वरित नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी धामणीचे सरपंच सागर जाधव व पहाडदऱ्याच्या सरपंच राजश्री संतोष कुरकुटे यांनी केली आहे. 

पोंदेवाडी येथे गावालगतच्या ओढ्याला मोठा पूर आला होता. पुराचे पाणी बाजुच्या शेतात घुसुन शेतजमीनीचे व पिकांचे मोठे नुकसान झाले. पुराचे पाणी रोडेवस्ती व टाकळकरवस्ती येथील अनेकांच्या घरात व गोठ्यात शिरल्याने मोठे नुकसान झाले. विशाल रोडे व सुरेश ज्ञानेश्वर गोसावी यांच्या घरात सुमारे गुडघाभर पाणी साचले. या दोन्ही कुटुंबाची ग्रामपंचायतीने अंगणवाडी व जवळच्या गोठ्यात राहण्याची व्यवस्था केली असल्याची माहीती खरेदी विक्री संघाचे माजी अध्यक्ष अनिल वाळूंज यांनी दिली. सरकारने संबधित नुकसानीचे पंचनामे करून त्वरीत नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी अनिल वाळुंज यांनी केली आहे.

या पावसामुळे खडकवाडीच्या खुडावस्ती येथील तळे पाण्याने तुडुंब भरले असून, ते फुटण्याचा धोका निर्माण झाला होता. ते ओळखून माजी सरपंच अनिल डोके यांनी ग्रामस्थांच्या मदतीने जेसीबीने तळ्याच्या कडेने चर खोदून पाणी एका बाजूने काढून दिले. त्यामुळे तळ्याच्या खालच्या बाजूला असलेल्या सुमारे तीनशे ते चारशे एकर जमिनीचे नुकसान टळले आहे. पोंदेवाडी- खडकवाडी रस्त्यावर सुमारे दोन ते अडीच फुट पाणी साचले. त्यामुळे या रस्त्यावरील दळणवळण ठप्प झाल्याने शेतात गेलेले नागरिक शेतातच अडकून पडले. येथील स्मशानभूमीत पुराचा पाणी शिरले होते.

सातगाव पठार : परिसरात आज (ता.  १९) दुपारी एकनंतर सलग दोन तास मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे वेळ नदी दुथडी भरून वाहत होती. तसेच, शेतांत पावसाचे पाणी साचल्याने शेताला शेततळ्याचे स्वरूप आले. त्यामुळे बटाटा काढणीची कामे देखील ठप्प झाली. सातगाव पठार भागात बटाटा काढणीची कामे सुरू आहेत. शेतामध्ये असलेल्या शेतकरी आणि मजूर यांची अचानक आलेल्या पावसाने धावपळ उडाली. पावसाचा जोर खूप होता. त्यामुळे बटाटा शेतातून पाण्याचे पाट वाहू लागले. अनेकांच्या बटाटा अरणीच्या काठावर पाणी शिरले. शेतात कामाला आलेले मजूर पावसामुळे काढणीचे काम बंद करून आडोशाला जाऊन उभे राहीले. 
दरम्यान, वेळ नदीला पूर आल्यामुळे गावातून जाणाऱ्या जुन्या पुणे- नाशिक महामार्गावरील वाहतूक बाहेरील महामार्गावरून वळविण्यात आली. येथील अनेक शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचले. मुसळधार पावसाने गावाच्या बाजूचे पाणी काढून देण्याचे चर पूर्ण पाणी भरून ते रस्त्यावर, शेतात शिरले. पेठ येथील शेतकरी दिलीप धुमाळ यांच्या बटाटा पिकात शेततळे झाले होते. सचिन तोडकर यांच्या बटाटा पिकात पावसाचे पाणी शिरून खूप मोठे नुकसान झाले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com