बारामतीचा पराभव मुख्यमंत्र्यांच्या जिव्हारी- राहुल कुल

रमेश वत्रे
शुक्रवार, 24 मे 2019

बारामती मतदारसंघात भाजप-शिवसेना महायुतीला जे यश मिळाले आहे, त्यात भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार कांचन कुल आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचा महत्त्वाचा वाटा असल्याचे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले, अशी माहिती कुल यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. 

दौंड (पुणे) : बारामती लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाच्या कांचन कुल यांचा झालेला पराभव हा मुख्यमंत्र्यांच्या जिव्हारी लागला असल्याची माहिती दौंडचे रासपचे आमदार राहुल कुल यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. कुल म्हणाले, मुख्यमंत्री फडणवीस यांनी भाजपच्या यशाचे श्रेय बारामती मतदारसंघातील महायुतीच्या कार्यकर्त्यांना दिले. फडणवीस यांनी कुल यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला आणि निकालाबाबत माहिती घेतली. तेव्हा त्यांनी भाजपच्या यशाचे श्रेय महायुतीच्या कार्यकर्त्यांना दिले. 

बारामती मतदारसंघात भाजप-शिवसेना महायुतीला जे यश मिळाले आहे, त्यात भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार कांचन कुल आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचा महत्त्वाचा वाटा असल्याचे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले, अशी माहिती कुल यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. 

मुख्यमंत्री फडणवीस यांनी बारामती मतदारसंघातील निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, नारायण राणे, अशोक चव्हाण, छगन भुजबळ, अजित पवार यांना मोदी लाटेची छळ बसली असली तरी या लाटेचा बारामतीत प्रभाव दिसला नाही. मोदी लाटेतही बारामतीचा गड अभेद्य राहिला. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या रणनीतीपुढे भाजपचा टिकाव लागला नाही. 

बारामती लोकसभा मतदारसंघातच पवार कुटुंबीयांना रोखता आल्याने राज्यात भाजपला चांगले यश मिळाले आहे. पवार कुटुंबीय बारामतीत अडकल्याने इतर मतदारसंघात भाजप-शिवसेनेला अनुकूल परिस्थिती मिळाली. भाजपच्या उमेदवार कांचन कुल यांना जी मते मिळाली आहेत, ती लक्षणीय आहेत. कार्यकर्त्यांनी नाराज होऊ नये. तुमचे काम तुम्ही केले आहे, असेही फडणवीस म्हणाले असल्याचे कुल यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: CM Devendra Fadanvis is unhappy About baramati Result says Rahul Kul