मुख्यमंत्र्यांपेक्षा दहीहंडी भारी

मिलिंद संगई
बुधवार, 31 जुलै 2019

बारामती शहरातील दहीहंडी मंडळाच्या तीव्र भावनांचा विचार करून भाजप प्रदेश कार्यकारिणीने मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेच्या बारामतीच्या तारखेत अखेर बदल केला. त्यामुळे आता 25 ऑगस्टऐवजी मुख्यमंत्री एक दिवस उशिरा म्हणजे 26 ऑगस्ट रोजी बारामतीत येणार आहेत. 

बारामतीतील महाजनादेश यात्रेची 25 आॅगस्ट रोजीची सभा एक दिवस पुढे ढकलली 

बारामती शहर (पुणे) : शहरातील दहीहंडी मंडळाच्या तीव्र भावनांचा विचार करून भाजप प्रदेश कार्यकारिणीने मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेच्या बारामतीच्या तारखेत अखेर बदल केला. त्यामुळे आता 25 ऑगस्टऐवजी मुख्यमंत्री एक दिवस उशिरा म्हणजे 26 ऑगस्ट रोजी बारामतीत येणार आहेत. 

याबाबत भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब गावडे यांनी आज बारामतीत पत्रकार परिषदेत माहिती दिली की, पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार मुख्यमंत्री 25 ऑगस्ट रोजी महाजनादेश यात्रेनिमित्त बारामतीत सभा घेऊन बारामतीत मुक्कामी राहणार होते, मात्र याच दिवशी बारामतीचा दहीहंडीचा उत्सव असतो. याबाबत पूर्वकल्पना नसल्याने 25 ऑगस्ट रोजी मुख्यमंत्र्यांची तारीख निश्‍चित झाली होती. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या सभेमुळे दहीहंडी उत्सवात अडथळा येणार होता. बारामतीच्या दहीहंडी मंडळांच्या तीव्र भावना विचारात घेऊन मी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोललो. त्यानंतर प्रदेश कार्यकारिणीने मुख्यमंत्र्यांचा बारामती दौरा एक दिवस पुढे ढकलला. आता नवीन वेळापत्रकानुसार मुख्यमंत्री 26 ऑगस्ट रोजी संध्याकाळी सात वाजता बारामतीत सभा घेऊन बारामतीत मुक्कामी राहणार आहेत. 27 ऑगस्ट रोजी सकाळी बारामतीत पत्रकार परिषद घेऊन ते पुढील कार्यक्रमासाठी रवाना होतील. 

दहीहंडी मंडळांच्या भावना न दुखावता त्यांचा रोष न पत्करता वेळापत्रकात बदल झाल्यामुळे आज सर्वांनी समाधान व्यक्त केले. या पत्रकार परिषदेस ऍड. नितीन भामे, सुरेंद्र जेवरे, सतीश फाळके, राजेश कांबळे यांच्यासह भाजपचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते. दहीहंडी मंडळाच्या वतीने भार्गव पाटसकर यांनी बाळासाहेब गावडे यांचे आभार व्यक्त केले. 
 

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: CM`s campen rally postponed in baramati