निगडी आगार : सीएनजी पंपांची वानवा

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 9 नोव्हेंबर 2019

  • निगडी आगारात चालक-वाहक पुरेशी संख्या
  • ई-बस गाड्या नवीन त्यामुळे, तूर्तास देखभाल-दुरुस्तीची समस्या नाही
  • सीएनजी गाड्यांच्या देखभाल-दुरुस्तीचे काम नियमित कर्मचाऱ्यांवर  
  • नवीन ई-बस गाड्यांच्या नियमित देखभालीसाठी कुशल मनुष्यबळ नाही, सध्या कंत्राटदार कंपनीकडेच देखभाल दुरुस्तीची जबाबदारी
  • डांगे चौक, भोसरीत ई-बस चार्जिंग स्टेशन उभारण्याचे प्रयत्न

पिंपरी - शहरातील पीएमपीचे निगडी (भक्ती-शक्ती) आगार हे ई-बसचे एकमेव स्थानक आहे. मात्र, तेथे बहुसंख्येने सीएनजी गाड्याच वापरात आहेत. परंतु, या ठिकाणी सीएनजी भरण्याचीच नीट सुविधा नसल्याने गाड्या चिखलीला पाठवाव्या लागतात. त्यामुळे येथे सीएनजी पंप वाढविण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

निगडीत पीएमपीचे आगार सुमारे चार ते पाच एकरवर आहे. येथे तत्कालीन पिंपरी-चिंचवड परिवहन समितीची (पीसीएमटी) मध्यवर्ती कार्यशाळा अस्तित्वात होती. भक्ती-शक्ती चौकालगत देखील या आगाराचे विस्तारीकरण झाले आहे. येथे ई-बसगाड्या चार्जिंग केल्या जातात. निगडी आगारासमोरच्या बाजूला साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे बस टर्मिनल तयार करण्यात आले आहे. या तिन्ही ठिकाणांहून चिंचवडगाव, भोसरी, कोथरूड, हडपसर, पुणे महापालिका, वारजे-माळवाडी, कात्रज आदी ठिकाणांहून गाड्यांची ये-जा सुरू असते. निगडी आगारामधून ३३ मार्गांवर गाड्या धावतात.

आगारातील सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आगारातील बसगाड्यांची संख्या १८४ असून, त्यामध्ये ई-बस २५, डिझेल १२ आणि उर्वरीत सीएनजी बसगाड्या आहेत. या आगाराला लवकरच ६० ई-बस  मिळणार आहेत. सध्या आगारात ई-बसगाड्यांसाठी १६ चार्जिंग स्टेशन आहेत. हीच संख्या सुमारे तीसपर्यंत नेण्याचे पीएमपी प्रशासनाचे प्रयत्न आहेत. लहान ई-बसगाड्यांना चार्जिंगसाठी साधारणतः अडीच तास लागतात. मोठ्या ई-बसगाड्यांना जवळपास तीन ते चार तास कालावधी चार्जिंगसाठी लागतो. डिझेलवरील बारा बसगाड्या लवकरच भंगारात जमा होणार आहेत. मात्र, आगारात बहुसंख्येने असलेल्या सीएनजी बसगाड्यांसाठी सीएनजी भरण्याची नीट 
व्यवस्थाच नाही. त्यामुळे गाड्यांना चिखलीत सीएनजी भरण्यासाठी जावे लागते. या आगारात सीएनजी पंपांचे किमान तीन आऊटलेट गरजेचे बनले आहे.  

पीएमपीकडून नाशिक-पुणे महामार्गावर भोसरी, मुंबई- पुणे महामार्गावर निगडीत बस टर्मिनल विकसित करण्यात आले आहे. मात्र, या ठिकाणी गाड्यांमध्ये सीएनजी भरण्याची सुविधा नाही. त्यामुळे तेथे ही सुविधा दिल्यास आगारांवरील सीएनजी भरण्याचा ताण कमी होणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: CNG Pump Issue in Nigdi depo