बिबवेवाडीत कोचिंग क्‍लासमध्ये आग

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 1 एप्रिल 2017

बिबवेवाडी - बिबवेवाडी-कोंढवा रस्त्यावर असलेल्या रविराज क्रू मॉलमधील इमारतीत पहिल्या मजल्यावर असलेल्या टीएसए कोचिंग क्‍लासचे कार्यालय व वर्गखोल्यांना शुक्रवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे आग लागली.  

बिबवेवाडी - बिबवेवाडी-कोंढवा रस्त्यावर असलेल्या रविराज क्रू मॉलमधील इमारतीत पहिल्या मजल्यावर असलेल्या टीएसए कोचिंग क्‍लासचे कार्यालय व वर्गखोल्यांना शुक्रवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे आग लागली.  

क्‍लासचे दोन हजार चौरस फुटांचे कार्यालय असून, चार वर्गखोल्या व कार्यालय आहे. उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे क्‍लासमधील वातानुकूलित यंत्रणा सुरू होती. त्यामध्ये शॉर्ट सर्किट होऊन आग लागली. आग एकदम भडकून संपूर्ण क्‍लासमध्ये परसली. क्‍लासमधील आठ ते दहा विद्यार्थ्यांना त्वरित बाहेर काढून आग विझवण्याचा प्रयत्न केला; परंतु आगीची तीव्रता मोठी असल्यामुळे तत्काळ अग्निशामक दलाला कळविल्याचे क्‍लासचे संचालक पीयूष कांकरिया यांनी सांगितले. पंधरा मिनिटांमध्ये अग्निशामक दलाचे कोंढवा व मुख्य कार्यालयातील तीन बंब घटनास्थळी पोचून अर्ध्या तासात आग आटोक्‍यात आणली. 

रविराज क्रू मॉलमध्ये एकूण ७३ गाळे असून, तळमजल्यात बाहेरील बाजूला बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालय आहे. इमारतीत जाण्यासाठी एकच मार्ग आहे. आग लागल्यानंतर संपूर्ण इमारतीत धूर झाल्याने इमारतीतील नागरिक रस्त्यावर पळाले. अग्निशामक दलाच्या जवानांना आगीचे लोट व धुरामुळे इमारतीत जिन्याने जाता येत नव्हते. आग विझविण्यासाठी इमारतीच्या बाहेरील बाजूने शिडीच्या साहाय्याने दुसऱ्या मजल्यावरील क्‍लासच्या काचा फोडून आग विझविण्यास सुरवात केल्याचे अग्निशामक दलाचे सुभाष भिलारे, दिलीप बिबवे व कैलास पायगुडे यांनी सांगितले. आगीमध्ये क्‍लासचे साहित्य व कागदपत्रे जळाली असून, कोणतीही जीवित हानी झाली नाही. 
आगीमुळे इमारतीचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला. त्यामुळे क्षेत्रीय कार्यालयातील आर्थिक वर्षअखेरीचे कामकाज ठप्प झाल्याचे बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालयाचे सहायक आयुक्त अविनाश सकपाळ यांनी सांगितले.

अग्निशामक केंद्राची प्रतीक्षा
बिबवेवाडी-कोंढवा रस्त्यावर गंगाधाम चौकात अग्निशामक दलाची इमारत दोन वर्षांपासून बांधून तयार आहे; परंतु अद्याप अग्निशामक केंद्र का सुरू केले नाही, हे मात्र गुलदस्तात आहे. अग्निशामक केंद्र सुरू असते, तर काही मिनिटांमध्ये घटनास्थळी मदत पोचवता आली असती, असे नागरिकांनी सांगितले.

Web Title: coaching class fire