पुणे: मंगळवार पेठेतील कोळशाच्या गोदामाला भीषण आग

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 3 एप्रिल 2017

कोळसा ज्वालाग्राही असल्याने ती आग आणखी खालीपर्यंत जाण्याचा धोका लक्षात घेऊन जेसीबीच्या साह्याने त्या ठिकाणी खोदून त्याबाबत शहानिशा करण्यात येत आहे.

पुणे : मंगळवार पेठेतील हॉटेल टुरिस्टच्या समोरील कोळशाच्या गोदामाला आज (सोमवार) सकाळी भीषण आग लागली. अग्निशमन दलाने ही आग नियंत्रणात आणली असून, अद्याप आग पूर्णपणे विझविण्याचे काम सुरू आहे. यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे सूत्रांनी सांगितले. 

अग्निशामक दलाचे सहा बंब, पाण्याचे 3 टँकर गोदामाच्या ठिकाणी तातडीने पोचले. त्यांच्या मदतीने आग नियंत्रणात आणण्यात आली. अग्निशमन दलाला 6 वाजून 8 मिनिटांनी घटनास्थळावरून कॉल आला. त्यानंतर अग्निशामक दलाचे जवान तातडीने बंब घेऊन घटनास्थळी दाखल झाले. त्यावर 7 वाजून 8 मिनिटांनी आग नियंत्रणात आणण्यात आली, अशी माहिती मुख्य अग्निशमन अधिकारी प्रशांत रणपिसे यांनी दिली. 

कोळशाचे गोदाम असल्याने तिथे आग अद्याप धुमसत असल्याचे सांगण्यात आले. कोळसा ज्वालाग्राही असल्याने ती आग आणखी खालीपर्यंत जाण्याचा धोका लक्षात घेऊन जेसीबीच्या साह्याने त्या ठिकाणी खोदून त्याबाबत शहानिशा करण्यात येत आहे. आजूबाजूला छोटी गोदामं असल्याने ही आग पूर्णपणे विझविण्याचे काम सुरू आहे, असे सहायक विभागीय अधिकारी द. ना. नागलकर यांनी सांगितले.  

दरम्यान, आग कशामुळे लागली याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. याप्रकरणी पोलिस पुढील तपास करीत आहेत.
 

Web Title: coal godown catches fire in pune's mangalwar peth