COEP त पदवी अभ्यासक्रमाच्या जागांमध्ये २५ टक्के वाढ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

COEP Engineering College

COEP त पदवी अभ्यासक्रमाच्या जागांमध्ये २५ टक्के वाढ

पुणे : अभियांत्रिकी महाविद्यालय पुणे एकल तंत्रज्ञान विद्यापीठातील (सीओईपी) पदवी अभ्यासक्रमांची (बी.टेक) प्रवेश क्षमता यंदा २५ टक्क्यांनी वाढविण्यात आली आहे. त्यामुळे शैक्षणिक वर्ष २०२२-२३ करिता अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमांच्या विद्यापीठातील विद्याशाखांमध्ये तब्बल १५० जागा वाढणार आहेत.

काही महिन्याभरापूर्वीच सीओईपीला एकल तंत्रज्ञान विद्यापीठाचा दर्जा मिळाला आहे. त्यामुळे यंदा विद्यापीठातील प्रवेशाबाबत विद्यार्थी आणि पालकांमध्ये उत्सुकता आहे. विद्यापीठात सध्या बी.टेक अभ्यासक्रमासाठी विविध शाखांमध्ये ५७० जागा आहेत. परंतु यंदा २५ टक्के प्रवेश क्षमता वाढविण्यात आल्याने जवळपास दीडशे जागा वाढणार आहेत. त्यानुसार विद्यापीठात पदवी अभ्यासक्रमासाठी जवळपास एकूण ७२० जागा उपलब्ध होऊ शकणार आहेत. यापूर्वी सीओईपीमध्ये ५७० जागांवर सीईटीतील गुणांच्या आधारे या राज्यातील विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येत होता.

तसेच याव्यतिरिक्त अधिसंख्या कोट्याअंतर्गत जवळपास २० जागा या जम्मू-काश्मीर आणि उत्तर भारतातील विद्यार्थ्यांसाठी अधिकच्या जागा म्हणून उपलब्ध करून दिल्या जात. परंतु राज्य सरकारने या २५ टक्के वाढीव जागांवर देश पातळीवरील विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यास नुकतीच मान्यता दिली आहे. त्यामुळे आता अन्य राज्यातील विद्यार्थ्यांनाही सीओईपीमध्ये प्रवेशाची संधी मिळू शकणार आहे.

त्यामुळे यापूर्वीप्रमाणे सीओईपीमध्ये असणाऱ्या ५७० जागा या १०० टक्के महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी उपलब्ध असणार आहेत. तर २५ टक्के वाढीव जागांवर ‘जेईई मेन’मधील स्कोअरच्या आधारे देश पातळीवरील विद्यार्थ्यांना संधी दिली जाईल, अशी माहिती ‘सीओईपी’चे संचालक डॉ. मुकुल सुतावणे यांनी दिली.

दरम्यान, सीओईपी एकल तंत्रज्ञान विद्यापीठातील पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या (एम.टेक, एम.प्लॅनिंग आणि एमबीए) प्रवेशासाठी ४८६ जागा उपलब्ध असून या प्रवेश क्षमतेत कोणतीही वाढ करण्यात आली नसल्याचेही विद्यापीठ प्रशासनातर्फे सांगण्यात आले आहे.

‘‘देश पातळीवरील ‘नॅशनल इन्स्टिट्यूट रॅंकिंग फ्रेमवर्क’च्या क्रमवारीत (एनआयआरफ) सीओईपी सलग काही वर्ष पहिल्या शंभरच्या आत आहे. त्यामुळे यंदा अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने जागा वाढवून देण्याचा मान दिला. त्याप्रमाणे सीओईपीने पदवी अभ्यासक्रमातील जागा वाढविण्याचा निर्णय घेतला. आता या २५ टक्के वाढीव जागा देश पातळीवरील विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी खुल्या करण्याला राज्य सरकारने मान्यता दिली आहे.’’

- डॉ. मुकुल सुतावणे, संचालक, सीओईपी एकल तंत्रज्ञान विद्यापीठ