
‘महाब्रँड्स’ यशोगाथेचे कॉफीटेबल बुक प्रकाशित
पुणे - व्यवसाय करीत असताना अनेक आव्हाने पेलत स्पर्धेत टिकण्यासाठी कायम नावीन्याचा ध्यास घेत दूरदृष्टी ठेवत आणि योग्य व्यवस्थापन करीत ‘ब्रँड’ म्हणून नावारूपास आलेल्या ‘महाब्रँड्स’ची यशोगाथा मांडणारे कॉफी टेबलबुक रविवारी (ता. २४) प्रकाशित करण्यात आले. या बुकचा लोकार्पण सोहळा म्हाळुंगे-बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलात पार पडला. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार, केंद्रीय सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण आणि ‘सकाळ’चे अध्यक्ष प्रतापराव पवार यांच्या हस्ते या कॉफीटेबल बुकचे प्रकाशन पार पडले.
शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या, आपल्या कौटुंबिक व्यवसायाला आणखी मोठे रूप देणाऱ्या आणि नवकल्पनेतून उद्योग सुरू करून दरवर्षी कोट्यवधी रुपयांची उलाढाल करीत अनेकांना रोजगार उपलब्ध करून देणाऱ्या ‘महाब्रँड्स’चा ‘सकाळ माध्यम समूहा’च्यावतीने गौरव करण्यात आला. हे महाब्रँड्स नेमके काय?, कोण आहेत?, कोणाच्या नेतृत्वाखाली हे ब्रँड निर्माण झाले?, या कंपन्यांचे व्हीजन काय आहे?, व्यवसायाच्या स्थापनेपासून त्यांचा आत्तापर्यंतचा प्रवास मांडणारी संपूर्ण माहिती या कॉफीटेबल बुकमध्ये आहे. कृषी, ऑटोमोबाईल, बांधकाम, उद्योग-व्यवसाय, शेती पूरक व्यवसाय यांसह विविध क्षेत्रातील उद्योजकांचा यात समावेश आहे. महाब्रँड्सने आपल्या क्षेत्रात कशी प्रगती केली आणि कोणत्या धोरणांच्या जोरावर उत्तुंग भराती घेतली याच्या विलक्षण प्रेरणादायी कथा या कॉफीटेबल बुकमध्ये मांडण्यात आल्या आहेत.
काहीतरी नवीन करू पाहत असलेल्या नवउद्योजकांना व्यवसाय सुरू करण्यासाठीची अत्यावश्यक माहिती या पुस्तकातून मिळेल. तसेच या यशस्वी उद्योजकांची यशोगाथा वाचून अनेकांना प्रेरणा मिळेल. त्यातून मिळालेल्या ऊर्जेतून आपला उद्योग उभारत यशस्वी झालेल्या महाब्रँड्सची संख्या वाढू शकेल, असे मत कॉफीटेबल बुकच्या प्रकाशन समारंभात उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.
कॉफीटेबल बुकची वैशिष्ट्ये...
राज्यातील ६३ महाब्रँड्सची यशोगाथा
व्यवसायात उत्तुंग भरारी कशी घेतली, याचे अनेक अनुभव
यशस्वी होण्यासाठी काय करावे, याबाबत मार्गदर्शन
व्यवसायातील आव्हानांचा सामना कसा केला, याबाबतचे अनेक स्वानुभव
शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्यांचा प्रेरणादायी प्रवास
Web Title: Coffee Table Book Mahabrands Published
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..