अतिथंडीचा फळबागांवर दुष्परिणाम

Cold-Effect on Agriculture
Cold-Effect on Agriculture

नारायणगाव - सध्या थंडीच्या लाटेमुळे फळ, भाजीपाला व फुले पिकांवरील दवबिंदूचे रूपांतर हिमकणात झाल्याने कोवळी पिके काळी पडली आहेत. पिकांच्या मुळालगत जमिनीचे तापमान कमी झाल्याने मुळाद्वारे होणारे अन्नद्रव्याचे शोषणाचे प्रमाण कमी झाले आहे. नीचांकी तापमानाचे विपरीत परिणाम द्राक्ष, पपई, केळी, अंजीर, डाळिंब या फळबागांवर दिसू लागले आहेत.

दरम्यान, यामुळे द्राक्षामध्ये बेरी क्रॅकींग, पिंकबेरीचे प्रमाण आढळून येत आहे. डाळिंबामध्ये फुलगळचे प्रमाण वाढले असून, फळांच्या फुगवणीवर परिणाम झाला आहे. नुकतीच लागवड केलेल्या भाजीपाला व वेलवर्गीय पिकांची कोवळी पाने अतिथंडीमुळे काळी पडली आहेत. या पिकांचे मोठे नुकसान होण्याची शक्‍यता आहे. केळी पिकांमध्ये पाने पिवळी होणे, करपा रोगाचा प्रादुर्भाव होणे, घड लवकर बाहेर न पडणे आदी दुष्परिणाम जाणवत आहेत. तालुक्‍यात मोठ्या प्रमाणात पपईची लागवड केली आहे. 

थंडीमुळे पपईची कोवळी पाने व फळे पिवळी पडली असून, मोठे नुकसान झाले आहे. भाजीपाला पिकांमध्ये झाडाची वाढ खुंटणे, पानाचा आकार लहान राहणे, पाने सुरकतलेली व आतमध्ये वळलेली असणे आदी दुष्परिणाम दिसून येत आहेत.

या स्थितीत तातडीने फळबागेत सेंद्रिय पदार्थांचे अच्छादन, रात्रीच्या वेळी पाणी देणे, विद्राव्य गंधकाचा जमिनीत वापर करणे, सिलिकॉनयुक्त औषधांची फवारणी करणे करणे फायदेशीर ठरेल.

जुन्नरला आंब्याचे नुकसान
जुन्नर - गेल्या आठवड्यात सलग दोन-तीन दिवस रात्रीचे तापमान सरासरीपेक्षा कमी झाल्याने जुन्नर तालुक्‍यातील पारुंडे, वैष्णवधाम आदी गावांतील भाजीपाला, फूल व फळबागांचे नुकसान झाले.

पिकांचा पंचनामा करण्याची मागणी होत आहे. पारुंडे व वैष्णवधामचे सरपंच सुमित्रा पवार व सुदाम डेरे यांनी ग्रामपंचायतीचा ठराव करून तहसीलदारांकडे पिकांच्या पंचनाम्याची मागणी केली. ८ व ९ फेब्रुवारी रोजी आलेल्या थंडीच्या लाटेने आंब्याच्या झाडांची पाने तसेच मोहोर करपला. त्याचा फटका आंबा उत्पादक शेतकऱ्यांना बसणार आहे. नंदू पवार यांच्या शेतातील केशर, राजपुरी, हापूस जातीच्या आंब्याच्या झाडांची पाने करपून गेली. भाजीपाला व फूल, फळवर्गीय पिकांवर हिमकण साचून पिकांचे नुकसान झाले.

निरगुडसरला बटाटा पीक करपले
निरगुडसर - थंडीच्या लाटेचा फटका आंबेगाव तालुक्‍यातील बटाटा, ऊस, मका, पालेभाज्या व चारा पिकांना बसला आहे. अतिथंडीमुळे दवबिंदू गोठल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले. पाणी कमी असलेल्या भागात थंडीच्या तीव्रतेचा मोठा फटका बसला आहे. निरगुडसर (ता. आंबेगाव) येथील रामदास यशवंत थोरात यांनी ठिबक सिंचनावर लागवड केलेले बटाटा पीक करपू लागले आहे. त्यांनी एका एकरावर बटाटा लावला होता. त्यातील निम्मे पीक करपले आहे. निरगुडसर - वळसेमळा येथील संदीप निवृत्ती हिंगे यांच्या उसाच्या शेतालाही अतिथंडीचा फटका बसला आहे. जवळे, भराडी, शिंगवे, वळती, रांजणी, नागापूर, खडकी, थोरांदळे परिसरातील पिकांनाही अतिथंडीचा फटका बसला आहे. प्रशासनाने नुकसानीचा तातडीने पंचनामा करून शेतकऱ्यांना भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. 

डॉ. टेमकर यांनी सुचविलेले उपाय
      कमी तापमानामुळे मुळाव्दारे अन्नद्रव्याचे शोषण होत नसल्याने फवारणीद्वारे नत्र, स्फुरद, पालाश व सूक्ष्म अन्नद्रव्यांची फवारणी आठवड्यातून एक किंवा दोन वेळा करावी.

      थंड वातावरणात नवीन केळीची लागवड टाळावी. थंडीच्या कालावधीत निर्धारित मात्रेपेक्षा वीसटक्के पालाश जास्त द्यावे. थंड वाऱ्यापासून संरक्षण करण्यासाठी केळी पिकाच्या दक्षिण व पश्‍चिम बाजूस वारा प्रतिरोधक म्हणून नेपियर गवत, सुरू, शेवरी या वनस्पतीची दोन ते तीन ओळीत लागवड करावी.

      शेतात उबदारपणा वाढवण्यासाठी निंबोळी पेंडीचा वापर करावा. पिकांना संध्याकाळी पाणी द्यावे. शेणखत, गांडुळ खताचा वापर करावा.

     भाजीपाला पिकांमध्ये उसाचे पाचट, रोगाचा प्रादुर्भाव नसलेली वाळलेली पाने, सोयाबीन, गव्हाचा भुसा आदी सेंद्रिय पदार्थ वापरून अच्छादन करावे. चंदेरी रंगाच्या पॉलिप्रोपेलीन पेपर किंवा पॉलिथिन पेपरचे अच्छादन घातल्यास फायदेशीर ठरू शकते. आच्छादनामुळे जमिनीतील तापमान स्थिर राहून सूक्ष्म उपयुक्त जिवाणूंची वाढ होण्यास मदत होते. 

     पहाटे दोनच्या सुमारास फळबागेमध्ये गहू, मका किंवा पाचटाचा भुसा अथवा लाकूड फाटा जाळून धूर केल्यास शीतवायू लहरींपासून फळबागेची संरक्षण होईल.

     शीतवायू लहरींचा अटकाव करण्यासाठी बागेच्या चारही बाजूंना सुती साड्या अथवा पन्नास टक्के शेडनेटचा वापर करावा.

     सर्व पिकांसाठी पाण्यात विद्राव्य गंधक प्रती एकर दोन ते तीन किलोग्रॅम दिल्यास थंडीच्या काळात अन्नद्रव्याचे शोषण होण्यास मदत होईल.

     डाळिंब, द्राक्ष, पपईच्या फळाभोवती पॉलिप्रोपेलिन पेपरपासून बनविलेल्या स्कर्टीग पिशव्यांचा वापर फायदेशीर ठरेल. कमी खर्चात वर्तमानपत्राचा वापर करणेसुद्धा फायदेशीर ठरेल.

     थंडीच्या कालावधीत केळी पिकांमध्ये लोंबणारी हिरवी, निरोगी वाळलेली पाने न काढता खोडा भोवती लपेटून ठेवावीत. करपा रोगाच्या नियंत्रणासाठी कार्बेन्डीझम दहा ग्रॅम, पन्नास मिली. मिनरल ऑइल दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

थंडीच्या लाटेमुळे वेलवर्गीय पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. हिमकणांमुळे वेलीवरील कारली, दोडका, कलिंगड, खरबूज, काकडी यांना तडे गेले आहेत. तसेच पाने, फुले व कोवळी फळे पिवळी व काळी पडली आहेत. फूलगळ व पानगळ झाल्याने उत्पादनात मोठी घट होणार असून, गुणवत्तेवरसुद्धा परिणाम होणार आहे.
- डॉ. भरत टेमकर, नारायणगाव कृषी विज्ञान केंद्राचे उद्यानविद्या विषयतज्ज्ञ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com